अजित पवार हे शुक्रवारी गिरीश बापट यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी शनिवारी पेठेतील त्यांच्या घरी गेले होते. गिरीश बापट यांचे निधन झाले त्यादिवशी अजित पवार नाशिकमध्ये होते. त्यामुळे ते बापटांच्या अंत्यविधीला येऊ शकले नव्हते. त्यामुळे आज सकाळी अजित पवार यांनी बापट कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी अजित पवार यांना विजय वडेट्टीवार यांनी पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याच्या केलेल्या वक्तव्याविषयी विचारण्यात आले. यावर अजित पवार यांनी वडेट्टीवार यांना खडसावले. अजित पवार यांनी म्हटले की, ‘ हे बघा, लगेच कुणी गुडघ्याला बाशिंग बांधायची गरज नाही. अजून गिरीश बापट जाऊन फक्त तिसरा दिवस आहे. एवढी कसली घाई आहे? माणसुकी वगैरे प्रकार आहे की नाही? काही परंपरा महाराष्ट्राची आहे की नाही. लोक काय म्हणतील यांना जनाची नाही तर मनाची तरी आहे की नाही, असे अजित पवार यांनी म्हटले.
यावेळी अजित पवार यांनी शिवसेना नेते नरेश म्हस्के यांनाही सुनावले. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत रोहित पवार यांना पाडण्यासाठी अजित पवार यांनी अनेकांना फोन केले होते, असा दावा नरेश म्हस्के यांनी केला होता. त्याबद्दल विचारणा झाल्यावर अजित पवार म्हणाले की, ‘ कोण नरेश म्हस्के? मी त्याला ओळखत नाही’, असा पवित्रा घेत अजित पवार यांनी या विषयावर फार बोलणे टाळले.
नरेश म्हस्केंना क्रिकेट आणि पवार घराणे कधीच कळणार नाही: रोहित पवार
नरेश म्हस्के यांच्या आरोपाबद्दल रोहित पवार यांनाही विचारण्यात आले. त्यावर रोहित पवार यांनी म्हटले की, नरेश म्हस्के मी त्यांना कधी भेटलो नाही, त्यांच्याबद्दल फारसं ऐकलं नाही. मी फक्त एकच गोष्ट ऐकली आहे की, त्यांना ठाण्याचा नगराध्यक्ष बनवायचं होतं, तेव्हा त्यांच्या पार्टीच्या नेत्याने विरोध केला होता. तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या हस्तक्षेपामुळे म्हस्के महापौर झाले. पण ज्या नेत्याने त्यांना विरोध केला होता, त्याच्याच पक्षात जाऊन ते आज त्यांची बाजू मांडत आहेत. नरेश म्हस्के यांना क्रिकेट आणि पवार घराणे कधीच कळणार नाही, अशी टिप्पणी रोहित पवार यांनी केली.