आप्पा पाडा भागात राहणारे बहुतांश विद्यार्थी गरीब, कष्टकरी वर्गातून येतात. यातील काही विद्यार्थी अर्धवेळ काम करून शिक्षण घेतात. मुंबई विद्यापीठ आणि त्याच्याशी संलग्न कॉलेजमध्ये येत्या काही दिवसांपासून परीक्षांना सुरुवात होत आहे. मात्र, आगीत वह्या आणि पुस्तके जळून खाक झाल्याने परीक्षेचा अभ्यास कसा करायचा? असा प्रश्न या विद्यार्थ्यांना पडला आहे. त्यातून विद्यार्थी मानसिक तणावाखाली आहेत. विद्यार्थी विकास निधीतून या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून द्यावे, विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करावे, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे सर्व शैक्षणिक साहित्य पुरवावे, ओळखपत्र आणि अन्य शुल्कांमध्ये सवलत द्यावी, अशी मागणी छात्र भारतीचे मुंबई अध्यक्ष विकास पटेकर यांनी केली आहे.
छात्र भारतीच्यावतीने या मागणीसाठी विद्यापीठाच्या फोर्ट संकुलातील प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. हातात फलक धरून छात्र भारतीने आंदोलन केले. तसेच मागण्या मान्य करून त्याचे परिपत्रक सर्व कॉलेजला पाठवेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला. विद्यार्थ्यांकडून बुधवारी दिवसभर आंदोलन करण्यात आले. आंदोलनात छात्र भारतीचे राज्याध्यक्ष रोहित ढाले, राज्यसंघटक सचिन बनसोडे उपस्थित होते.
मंडळांकडून मदतीचा हात
मालाड आप्पा पाडा येथील भीषण आगीत संसार बेचिराख झालेल्या कुटुंबांना गणेशोत्सव मंडळांनी मदतीचा हात दिला आहे. बोरीवलीतील काजूपाडा येथील श्री काजूपाड्याचा राजा गणेशोत्सव मंडळ आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या श्री वडेश्वर मित्र मंडळाकडून आपुलकी मदत केंद्राद्वारे जीवनावश्यक वस्तू व अन्न धान्य आदींचा साठा पीडीत कुटुंबांना दिला. मंडळांच्या सुमारे ५० कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गहू, तांदूळ, पीठ, तेल, चहा, पावडर, बिस्कीटे, प्लास्टिक बादली, मग, कपडे, बेडशीट, चादर, ब्लँकेट आदी साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष संजय मोरे, हेमचंद्र नार्वेकर, रवींद्र गायकर, विवेक मोरे उपस्थित होते.