• Mon. Nov 25th, 2024
    भाजप खासदार गिरीश बापट यांची प्रकृती खालावली, दीनानाथ रुग्णालयात व्हेंटिलेटरवर

    पुणे: पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार, कसब्याचे माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. त्यांच्यावर सध्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून गिरीश बापट हे आजारी आहेत. मात्र, कालपासून त्यांची प्रकृती आणखी खालावली आहे. या पार्श्वभूमीवर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टरांनी बुधवारी हेल्थ बुलेटिन काढून गिरीश बापट यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली. त्यामध्ये म्हटले आहे की, गिरीश बापट यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असून ते व्हेंटिलेटवर म्हणजेच जीवनरक्षक प्रणालीवर आहेत. डॉक्टरांचे एक पथक गिरीश बापट यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. दुपारी दोन वाजल्यानंतर गिरीश बापट यांच्या प्रकृतीविषयी आणखी सविस्तर माहिती देऊ, असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

    गिरीश बापट हे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असून गेली अनेक वर्षे पुण्यातील राजकारणात त्यांचा दबदबा होता. मात्र,गेल्या काही वर्षांपासून गिरीश बापट यांना दुर्धर आजाराची लागण झाल्यामुळे ते राजकारणापासून दूर होते. त्यांचा मतदारसंघातील वावर जवळपास संपला होता. मात्र, नुकत्याच झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजप पक्ष अडचणीत सापडला असताना गिरीश बापट यांनी आजारपण बाजुला सारून कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला हजेरी लावली होती. या मेळाव्याला येतानाही गिरीश बापट यांच्या नाकात नळी आणि सोबत ऑक्सिजन सिलेंडर होता. या परिस्थितीमध्येही गिरीश बापट यांनी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत त्यांच्यात चैतन्य फुंकण्याचा प्रयत्न केला होता. या मेळाव्यात गिरीश बापट यांना बोलताना प्रचंड धाप लागत होती. परंतु, इच्छाशक्तीच्या बळावर गिरीश बापट यांनी त्यांची कामगिरी फत्ते केली होती.

    नाकात नळी, ऑक्सिजन सिलिंडर… तरी व्हिलचेअरवरुन गिरीश बापट कसबा निवडणुकीच्या प्रचारात

    या मेळाव्यानंतरही गिरीश बापट यांनी प्रकृती काहीशी खालावल्याची चर्चा होती. बापट इतके आजारी असतानाही भाजपने त्यांना प्रचाराच्या मैदानात उतरवल्यामुळे अनेकांनी टीकाही केली होती. कसबा पोटनिवडणुकीच्या काळात भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शाह हे गिरीश बापट यांच्या पुण्यातील घरी गेले होते. यावेळी अमित शाह आणि गिरीश बापट यांनी गप्पा मारल्या होत्या. दोन्ही नेत्यांनी या भेटीत जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. मुक्ता टिळक यांच्याआधी कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार म्हणून गिरीश बापट यांनी जवळपास ३० वर्षे या मतदारसंघाचे नेतृत्व केलं आहे. तसेच बापट हे पुणे शहराचे विद्यमान खासदार आहेत. सर्वपक्षीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध असणारा आणि निवडणुकीच्या राजकारणात माहीर असलेला नेता म्हणून गिरीश बापट यांची ओळख आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *