• Sat. Sep 21st, 2024

मुंबईकर झाले शहाणे! पालिकेकडून सक्ती नसतानाही शहरात मास्कचा वापर वाढला

मुंबईकर झाले शहाणे! पालिकेकडून सक्ती नसतानाही शहरात मास्कचा वापर वाढला

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : करोना, इन्फ्लूएन्जाची लागण होणाऱ्या रुग्णांची संख्या हळूहळू वाढत असल्याने मास्क वापरणाऱ्या सामान्यांचे प्रमाण वाढत आहे. मुंबई महापालिकेने अद्याप कोणत्याही प्रकारच्या मास्कची सक्ती केलेली नसून राज्य सरकारच्या यासंदर्भातील निर्देशांचे पालन पालिका करेल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.सहआजार असलेले, ज्येष्ठ नागरिक तसेच गर्भवती महिला आणि लहान मुलांनी अधिक काळजी घ्यावी. मास्कचा वापर आवर्जून करावा, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. इन्फ्लूएन्जा स्वरूपाच्या साथीचा संसर्ग वाढत असल्यामुळे मुंबईकरांनी खबरदारीचा उपाय म्हणून मास्कचा वापर सुरू केला आहे. गर्दीच्या ठिकाणी, रुग्णालयांमध्ये, घरामध्ये कोणाला ताप आला असेल वा संसर्गित रुग्णाच्या संपर्कात जाताना मास्कचा वापर करायला हवा, याकडेही डॉक्टरांनी लक्ष वेधले आहे. मात्र पालिकेने अद्याप मास्कसक्ती करण्यासंदर्भातील कोणताही आदेश प्रसारित केलेला नाही. मुंबईमध्ये फ्लू रुग्णांची संख्या अद्याप वाढलेली नाही, त्यामुळे घाबरून जाऊ नये, असे आवाहनही डॉक्टरांनी केले आहे.

पालिकेची तयारी

रुग्णालयामध्ये दाखल करताना विलगीकरण कक्षाची उपलब्धता करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संसर्गित रुग्णांची संख्या अधिक वाढली आहे. त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्याची वेळ आली तर कस्तुरबा रुग्णालयाचा पर्याय पालिकेने तयार ठेवला आहे.

लक्षणे कोणती?

घसादुखी, खोकला तसेच दीर्घकाळ राहणारी सर्दी, घशातील दुखणे अशा स्वरूपाच्या तक्रारी वाढताना दिसत आहेत. थंड वातावरणामध्ये हे आजार अधिक बळावत असल्याचेही दिसून आले आहे. मास्कचा वापर केल्यास इतर बाधित व्यक्तीचा संसर्ग आपल्याला होत नाही. प्रवास करतानाही मास्कचा वापर केल्यास मदत होऊ शकेल, असे फिजिशिअन डॉ. सुहास मोडे यांनी सांगितले.

काँग्रेसने विचारांशी तडजोड केली नाही, सावरकरांच्या वादावर पटोलेंचं ठाकरेंना प्रत्युत्तर

राज्यात २०५ नवे करोनारुग्ण

राज्यात सोमवारी करोनाच्या २०५ नव्या रुग्णांची नोंद झाली. मात्र एकाही करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू करोनामुळे झालेला नाही. मृत्युदर १.८२ टक्के असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. आत्तापर्यंत तपासण्यात आलेल्या प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ९.४० टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आरटीपीसीआर चाचणी करण्यात आलेल्या प्रवाशांची संख्या ३५,०३१ असून तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या ४२ इतकी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed