पुणे दि. २६: भौतिक संपत्तीपेक्षा मानवता धर्म शिकविणारा भारताचा आध्यात्मिक विचार जगात श्रेष्ठ असून या विचारांच्या बळावर भारत जगाला मार्गदर्शन करू शकतो. ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार विजेत्यांनी अशाच अध्यात्मिक विचार गंगेने मानवी मनाचे पोषण केले आहे. त्यांच्याकडून मानव कल्याणाचे कार्य असेच सुरू राहावे, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
राज्य शासनाच्यावतीने संत साहित्य तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार २०१९-२०२२ वितरण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चावरे, पुरस्कार निवड समितीचे सदस्य उपस्थित होते.
श्री.मुनगंटीवार म्हणाले, माणूस जन्माच्या वेळी काही घेऊन येत नाही आणि मृत्यूसमयी काहीच घेऊन जात नाही एवढ्यापुरता जगाचा विचार मर्यादित आहे, मात्र या देशात आत्म्याच्या उन्नतीचा विचार केला जात असल्याने संत ज्ञानेश्वर महाराज वयाच्या १६ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहितात आणि छत्रपती शिवाजी महाराज १५ व्या वर्षी स्वराज्यासाठी तलवार हाती घेतात. हे या देशातील अध्यात्म आहे. म्हणूनच जग जिंकणारे आक्रमक, राजे महाराजे, आपल्यासाठी आदर्श ठरले नाहीत. त्याग, मानवता, सेवा आणि सत्याचा संदेश देणारे राम, कृष्ण, महावीर, छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी आदर्श आहेत.
रंजल्या गांजल्यांवर प्रेम करणारा खरा संत असतो, त्याच्यात देवाचे दर्शन होते असा संदेश संत तुकाराम महाराजांनी दिला. हा विचार मानवताधर्म सांगतो. पुरस्कार विजेते या विचारांचे वाहक आहेत. म्हणून त्यांच्यासमोर पुरस्कार खूप छोटा आहे. त्यांच्या मुखातून निघालेली आध्यात्मिक गंगा मुक्तीदायिनी आहे. त्यांच्या विचारांच्या परिसस्पर्शाने मानवी जीवनाचे सोने होते, असे त्यांनी सांगितले.
यावेळी पुरस्कार विजेत्यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.खारगे यांनी केले. ते म्हणाले, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांनी प्रेम आणि मानवतेचा संदेश दिला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ज्ञानोबा-तुकोबांचा गजर घुमतो आहे. थोर संतांची शिकवण लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य संत साहित्याचे लेखक, प्रवचनकार, कीर्तनकार, निरूपणकार करत आहेत. त्यांचा सन्मान व्हावा म्हणून शासनाने ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार सुरू केला आहे.
सांस्कृतिक कार्य विभागातर्फे संत विचार जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. कीर्तन प्रबोधन क्षेत्रातील संस्थांना सहकार्य केले जाते, या क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना पुरस्कृत करण्यात येते. दरवर्षी ३० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येते, असे त्यांनी सांगितले.
मंत्री श्री.मुनगंटीवार यांच्या हस्ते ह.भ.प.बद्रीनाथ तनपुरे यांना २०१९-२० साठीचा, स्वामी श्री गोविंददेव गिरी यांना २०२१-२२, महंत बाभूळगांवकर शास्त्री यांना २०२२-२३ साठीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांना २०२०-२१ पुरस्कार प्रदान करण्यात येणार होता. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाही. चित्रफितीच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा प्रवास दाखविण्यात आला.
संत साहित्यावर उत्कृष्ट साहित्य लिहिणाऱ्या किंवा संतांना अभिप्रेत असलेल्या मानवतावादी कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तीला राज्य शासनाच्यावतीने प्रतिवर्षी ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. ५ लक्ष रुपये रोख, मानपत्र तसेच मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
पुरस्कार प्रदान समारंभाप्रसंगी ‘भक्तीसागर’ या भक्तीमय सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. सुप्रसिद्ध गायक अजित कडकडे, समीर अभ्यंकर, आसावरी जोशी, विशाल भांगे यांचा भक्तीगायनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. सांस्कृतिक कार्य संचालनालय निर्मित ‘अवघा रंग एक झाला’ या पुस्तकाचे प्रकाशनदेखील यावेळी श्री.मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार निवड समितीचे सदस्य डॉ. मुकुंद दातार, शिवाजी महाराज मोरे, राजेश देगलूरकर, आचार्य तुषार भोसले,विठ्ठल रुक्मिणी पंढरपूर संस्थानचे अध्यक्ष प्रकाश महाराज जवंजाळ, संत ज्ञानेश्वर देवस्थान आळंदीचे विश्वस्त ॲड. विकास ढगे, जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त हरिभक्त परायण नितिन महाराज मोरे,वारकरी शिक्षण संस्थेचे चंदीले नाना संतोष महाराज, अभिनेत्री प्रिया बेर्डे, ह.भ.प. अक्षय महाराज भोसले, माजी निवड समिती सदस्य उल्हास पवार आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राच्या राज्यगीताने झाली. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
000