• Mon. Nov 25th, 2024

    शिर्डीत ‘थीम पार्क’ उभारण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    ByMH LIVE NEWS

    Mar 26, 2023
    शिर्डीत ‘थीम पार्क’ उभारण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    महापशुधन एक्सपो २०२३’ चा समारोप व बक्षिस वितरण

     महापशुधन एक्स्पोला तीन दिवसांत ८ लाख लोकांनी दिली भेट

    शिर्डी, दि.२६ (उमाका वृत्तसेवा) – शेतकरी केंद्रबिंदू ठेवून शासन काम करीत आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही. अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिर्डी येथील महापशुधन प्रदर्शन समारोप कार्यक्रमात दिली.  श्री साईबाबांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या शिर्डीत ‘थीम पार्क’ उभे करण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही‌. नगरविकास विभागाच्या माध्यमातून यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी यावेळी शिर्डीकरांना आश्वस्त केले.

    राज्य शासनाच्या पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाच्या वतीने शिर्डी येथे आयोजित तीन दिवसीय ‘महापशुधन एक्सपो २०२३’ चा समारोप व बक्षिस वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी व्यासपीठावर महसूल, पशुसंवर्धन, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे, आमदार सर्वश्री जयकुमार गोरे, बबनराव पाचपुते, राहूल कूल, मोनिका राजळे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन‌ शिवाजीराव कर्डीले, ‘महानंदा’ चे चेअरमन राजेश परजणे, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जगदीश प्रसाद गुप्ता आदी उपस्थित होते.

    मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, ‘पशुधन हिताय, बहुजन सुखाय ब्रीद’ जपत शेतकरी, पशुपालकांसाठी काम करणारे हे शासन आहे. ‘लम्पी’ नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. सप्टेंबर २०२३ पर्यंत ‘लम्पी’ लस निर्मिती करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरणार आहे.  सरकारने सादर केलेल्या पंचामृत अर्थसंकल्पात शाश्वत शेतीला प्राधान्य देण्यात आले आहे.  ‘पशुधन’ हा शेतीला पूरक असा व्यवसाय आहे. पशुधन वाढले पाहिजे, जोपासले पाहिजे, यासाठी नवनवीन प्रजातींची माहिती प्राप्त करून घेण्याची गरज आहे. ‘महापशुधन एक्स्पो’ च्या माध्यमातून शेतकऱ्यांना शास्त्रीय पद्धतीने शेती व पशुपालन करण्याचे ज्ञान मिळत असते. त्यामुळे ‘महापशुधन एक्स्पो’ शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

    मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, शेतकरी सन्मान योजनेत केंद्र व राज्य शासन मिळून १२ हजार रूपयांची व दुष्काळी जिल्ह्यात २१ हजार रूपयांची वार्षिक मदत दिली जाणार आहे. शेळी-मेंढी विकास महामंडळासाठी बिनभांडवली कर्जासाठी शासनाने १० हजार कोटींची तरतूद केली आहे. महिलांसाठी एस.टी बसमध्ये ५० टक्के तिकिट सवलत, मुलींसाठी लेक लाडकी योजना राबवित आहे. सर्व समाजघटकांना बरोबर घेऊन विकास साधणारे हे सर्वसामान्यांचे सरकार आहे.

    केंद्राच्या सहकार्यामुळे विकासाला वेग

    महाराष्ट्रातील साखर उद्योग अडचणीत असताना केंद्र सरकारने एका बैठकीतच १० हजार कोटींचा आयकर माफ करण्याचा निर्णय घेतला. राज्याच्या पायाभूत सुविधा, शहर विकासासाठी केंद्र सरकार राज्याला हजारो कोटी रूपये देत आहे‌. रेल्वे, रस्त्याच्या प्रलंबित प्रकल्पासाठी केंद्राने साडेतेरा हजार कोटी रूपये दिले असल्याचेही  मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी सांगितले.

    दूध भेसळ न करण्याचे पशुसंवर्धनमंत्र्यांचे आवाहन

    पशुसंवर्धनमंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले की, तीन दिवसीय महापशुधन प्रदर्शनात आतापर्यंत ८ लाख लोकांनी भेट दिली आहे. राज्य सरकार दूध उत्पादकांना सर्वाधिक दर देत आहे. मात्र दूध भेसळ करू नका असे. आवाहन करत पशुसंवर्धनमंत्री म्हणाले, लम्पी आजारावर मोफत लस देणारे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. निळवंडे प्रकल्पास ५५० कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाने घेतला. वाळू माफियांच्या बंदोबस्त करत सर्वसामान्यांना ६०० रूपये ब्रासने घरापर्यंत वाळू उपलब्ध करून देणारे हे सर्वसामान्यांच्या मनातील सरकार आहे.

    ग्रामविकास मंत्री श्री. महाजन  म्हणाले की, अहमदनगर जिल्हा सहकार , शिक्षण, कारखानदारी, बॅकिंग या क्षेत्रात अग्रेसर आहे. निसर्ग चक्र बदले असून अवकाळी, गारपीटने शेती पिकांचे अतोनात नुकसान होते. अशावेळेस शेतीला पूरक असा जोडधंदा करणे गरजेचे आहे.

    शिर्डीचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांनीही आपले मनोगत व्यक्त यावेळी केले.

    यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पशुधन स्पर्धत प्रथम पुरस्कार प्राप्त काही पशुपालकांना शाल, श्री‌फळ, सन्मानचिन्ह व बक्षिस रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.

    महाराष्ट्रातील धाराशिव या आकांक्षित जिल्ह्यामध्ये पशुवैद्यकीय सेवांच्या बळकटीकरणासाठी (A –  HELP अंतर्गत ) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), पशुसंवर्धन विभाग व भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड यांच्यातील सामंजस्य करार यावेळी करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अहमदनगर जिल्हा नियोजन निधी अंतर्गत ‘ई-ऑफीस’ प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला.

    प्रास्ताविक खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले. आभार पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी मानले.

    000000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed