• Sat. Sep 21st, 2024

वनांचे रक्षण व संवर्धन करण्‍यात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचा सिंहाचा वाटा  – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

ByMH LIVE NEWS

Feb 28, 2023
वनांचे रक्षण व संवर्धन करण्‍यात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचा सिंहाचा वाटा  – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

नागपूर / चंद्रपूर,दि. 28 : वनपरिक्षेत्र अधिकारी (आर.एफ.ओ.) हा वन खात्‍याचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. त्यांच्‍यामुळेच वनांचे रक्षण व संवर्धन होण्‍यास मदत होते, असे प्रतिपादन वने, सांस्‍कृतिक कार्य, मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

फॉरेस्‍ट रेंजर्स असोसिएशन, महाराष्‍ट्र द्वारे आयोजित राज्‍यस्‍तरीय अधिवेशनात बोलताना श्री.मुनगंटीवार बोलत होते. कार्यक्रमाला फॉरेस्‍ट रेंजर असोसिएशनचे महाराष्‍ट्र अध्‍यक्ष कांतेश्‍वर बोलके, अरुण तिखे, असोसिएशनचे सरचिटणीस नीलेश गावंडे, नागपूरचे मुख्‍य वनसंरक्षक रंगनाथ नायकडे, संस्‍थेचे संस्‍थापक अध्‍यक्ष विनोद देशमुख, संस्‍थेचे माजी सरचिटणीस किशोर मिश्रीकोटकर मंचावर उपस्थित होते.

श्री.मुनगंटीवार पुढे म्‍हणाले की, प्रत्‍येक आर.एफ.ओ. कडे वन विभागाची पूर्ण जबाबदारी असते व ती जबाबदारी पूर्ण गांभिर्याने प्रत्‍येक आर.एफ.ओ. पार पाडत असतो याचे मला समाधान आहे. फॉरेस्‍ट सर्व्‍हे ऑफ इंडिया यांच्‍या एका अहवालानुसार महाराष्‍ट्राचे हरित क्षेत्र 2550 स्‍वेअर किमीने वाढले आहे. तसेच मॅनग्रोजचे क्षेत्र सुद्धा वाढले आहे. वनक्षेत्राशी संबंधित ज्‍या गोष्‍टी चांगल्‍या होत आहेत. त्‍यामध्‍ये तुमचा तसेच वनविभागाच्‍या सर्व कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे. गेल्‍या काही वर्षात विदर्भात वाघांच्‍या संख्‍येत वाढ झाली आहे. त्‍यांचे संवर्धन व संरक्षण ही जबाबदारी सुद्धा तुम्‍ही सर्वजण उत्‍तम पद्धतीने करता ही आनंदाची गोष्‍ट आहे. वनविभागाच्‍या संवर्धनामध्‍ये तुमच्‍यासह सर्व कर्मचाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे व महाराष्‍ट्र वनविभाग देशात नंबर एकवर राहण्‍यासाठी सर्वांनी प्रयत्‍न करावा, असे आवाहन श्री.मुनगंटीवार यांनी केले. या कार्यक्रमात आपण अनेक विषय मांडले आहेत. यात बऱ्याच मागण्‍या सुद्धा आहेत, याचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात येईल, अशी ग्वाही मुनगंटीवार यांनी याप्रसंगी दिली.

प्रास्‍ताविकात असोसिएशनचे सरचिटणीस श्री. गावंडे यांनी आर.एफ.ओ. चे विविध अधिकार व समस्‍यांवर सादरीकरण केले.

०००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed