• Mon. Nov 25th, 2024

    विमा कामगारांसाठी बल्लारपुरात १०० खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय उभारणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    ByMH LIVE NEWS

    Feb 23, 2023
    विमा कामगारांसाठी बल्लारपुरात १०० खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय उभारणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    चंद्रपूर, दि. 23 : चंद्रपूर जिल्ह्यात विविध औद्योगिक आस्थापना असल्यामुळे येथे कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कामगारांच्या आरोग्याचे संरक्षण करणे ही आपली पहिली प्राथमिकता आहे. त्यामुळेच महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी अंतर्गत विमा असणाऱ्या कामगारांसाठी बल्लारपूर येथे 100 खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय उभारण्यात येईल, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

    बल्लारपूर येथे विमा कामगारांसाठी सेवा दवाखान्याचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी वन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, डॉ. मंगेश गुलवाडे, माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा, आशिष देवतळे, संचालक (प्रशासन) महेश वरुडकर, निलेश खरबडे, मनीष पांडे, वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. सतीश नलगुंडवार, डॉ. नितीन टाकरखेडे, डॉ. प्रमोद बोदेले,मनिष डांगे आदी उपस्थित होते.

    विमा कामगारांसाठी बल्लारपुरात रुग्णालय सुरु करण्याबाबत मुंबईत बैठक घेतली, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, बैठकीनंतर केवळ दीड महिन्यात हा दवाखाना सुरू झाला, याचा आनंद आहे. चंद्रपूर आणि बल्लारपुर ही कामगार नगरी आहे. 14632 विमाधारक कामगारांच्या कुटुंबांना या दवाखान्याचा उपयोग होणार आहे. योग्य क्षणी उपचार मिळाले तर पुढील त्रास कमी होतो, या निमित्ताने या दवाखान्याचे महत्व आहे. या रुग्णालयात रुग्णवाहिका, एक्स रे मशीन, ईसीजी, रक्तचाचणी, लघवी चाचणी, केअर युनीट आदी सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्याव्या, अशा सुचना त्यांनी कामगार विमा सोसायटीला केल्या.

    पालकमंत्री पुढे म्हणाले, ज्या जिल्ह्यात 50 हजारांपेक्षा जास्त कामगारांची नोंदणी होते, तेथेच 100 खाटांचे रुग्णालय मंजूर केले जाते. आपल्या जिल्ह्यात कामगारांच्या नोंदणीचा आकडा 50 हजारांपेक्षा कमी आहे. ही बाब केंद्रीय मंत्री भूपेंद्रजी यादव यांच्या कानावर आपण व्यक्तिश: घातली. त्यामुळे केंद्र सरकारनेही या निकषात विशेष सूट देऊन 100 खाटांच्या रुग्णालयासाठी होकार दिला आहे. आपल्या राज्याची सुरवात चांदा ते बांदाअशी होते. त्यामुळे चांदा मागे राहू नये, यासाठी आपण सदैव कटिबध्द आहोत.

    बल्लारपूर चंद्रपूर मार्गावर कामगार रुग्णालय उभे राहणार असून यासाठी पाच एकर जागेची आवश्यकता आहे. चंद्रपूरात अत्याधुनिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, टाटा कॅन्सर हॉस्पीटल नंतर आता कामगार विमा सोसायटी अंतर्गत 100 खाटांचे रुग्णालय उभे राहत आहे. येथील जनतेची सेवा करणे, हे एक लोकप्रतिनिधी म्हणून मी माझे सौभाग्य समजतो.

    बल्लारपूरात एसएनडीटी विद्यापिठाच्या उपकेंद्रांतर्गत 43 नव्हे तर 63 कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम मंजूर झाले आहेत. सैनिकी शाळा, बॉटनिकल गार्डन, विमा रुग्णालय, विद्यापीठ हे सर्व मोठे वरदान ठरणार आहे.

    नागरिकांचे आरोग्य  नेहमी उत्तम राहावे, अशी आपली नेहमीच सदिच्छा राहिली आहे. दवाखान्यात जातांना रुग्णाच्या चेहऱ्यावर त्रासाचे भाव असले तरी उपचार घेऊन घरी परत जातांना त्याच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे भाव असावे. या दृष्टीने रुग्णांना सेवा द्यावी. चंद्रपुरातील उन्हाळा बघता या रुग्णालयात वातानुकूलित यंत्रणा बसवावी. येथील कामगारांसाठी एक हक्काचा दवाखाना उघडू शकलो, याचे नक्कीच समाधान आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. सतिश नलगुंडवार यांनी तर संचालन भाजपा शहर अध्यक्ष काशिनाथ सिंग यांनी केले. यावेळी डॉ. अमृता सुतार यांच्यासह कामगार कुटुंब उपस्थित होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed