• Mon. Nov 25th, 2024

    आरोग्य विभागाकडील प्रलंबित प्रस्ताव तातडीने मार्गी लावावेत – आरोग्य मंत्री तानाजी सावंत

    ByMH LIVE NEWS

    Jan 31, 2023
    आरोग्य विभागाकडील प्रलंबित प्रस्ताव तातडीने मार्गी लावावेत – आरोग्य मंत्री तानाजी सावंत

    मुंबई, दि. 31 :  आरोग्य विषयक विविध पायाभूत सोयी सुविधा वाढविण्याची मागणी सातत्याने होत असते. लोकप्रतिनिधींकडून विविध मागण्यांचे प्रस्ताव येतात. त्यामध्ये प्रामुख्याने पायाभूत सुविधा वाढ‍विणे, पदभरती, रिक्त पदे भरणे आदींचा समावेश असतो. आरोग्य विभागाकडीन प्रलंबित असलेले विविध प्रस्ताव तातडीने मार्गी लावावेत, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी दिले.

    मंत्रालयातील मंत्री दालनात आरोग्य विषयक विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री श्री. सावंत बोलत होते. विषयानुसार बैठकीला दहिसरचे आमदार मनीषा चौधरी, भंडाराचे आमदार नरेंद्र भोंडकर, लातूरचे आमदार अमित देशमुख, उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी, बालाजी किणीकर, प्रधान सचिव संजय खंदारे, सचिव नवीन सोना, संचालक डॉ. स्वप्नील लाळे, सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड आदी उपस्थित होते.

    मंत्री श्री. सावंत म्हणाले की, कोविड काळात मुलांवर झालेल्या मानसिक तणावाचा विभागामार्फत अभ्यास करून शोध प्रबंधाच्या स्वरूपात अहवाल तयार करावा. जेणेकरून भविष्यात पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झाल्यास हा अहवाल दिशादर्शक ठरेल. मानसिक आरोग्याबाबत डॉक्टरांचे प्रशिक्षण पूर्ण करावे. मानसिक आरोग्याबाबत कार्यक्रमाची अंमलबजावणी विहीत कालावधीत पूर्ण करावी.

    भंडारा जिल्हा आरोग्य विषयक आढावा

    भंडारा जिल्ह्यातील विविध आरोग्य विषयक प्रस्तावांबाबत बैठकीत श्री. सावंत म्हणाले, भंडारा महिला रुग्णालयाचे काम 75 टक्के पूर्ण झाले असल्यास ‘कर्मचारी आराखडा’ द्यावा. त्यासाठी प्रस्ताव तपासून घ्या. जिल्ह्यातील श्रेणीवर्धन करणे, खाटांची संख्या वाढविणे, रिक्त पदांची भरती, अड्याळ, पवनी, लाखांदूर, लाखणी, मोहाडी, पालांदूर व सिंहोरा ही रुग्णालये कार्यान्व‍ित करणे, मानेगाव ता. भंडारा व चिंचाड ता. पवनी येथील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र निर्मिती, कार्यरत मनुष्यबळामध्ये वाढ करणे आदी प्रस्ताव मार्गी लावावेत.

    प्रयोगशाळांच्या तपासणी यंत्रणेबाबत स्वतंत्र बैठक लवकरच

    केंद्र शासनाच्या राजपत्रानुसार मेडिकल लॅबोरेटरीबाबत निर्णय घ्यावा. तसेच नियमांचे पालन न करता पॅथॉलॉजी प्रयोगशाळांमधून तपासणी अहवाल दिले जात असल्यास, चुकीचे अहवाल देऊन रुग्णांच्या जीवाशी खेळल्याचे निदर्शनास आल्यास अशा प्रयोगशाळांची तपासणी करणे गरजेचे आहे. याबाबत भरारी पथकांसारखी यंत्रणा उभी करण्यासाठी लवकरच स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असे श्री. सावंत यांनी सांगितले.

    उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालय

    ठाणे जिल्हा रुग्णालय, मीरा भायंदर रुग्णालय व उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालय या तीनही आरोग्य यंत्रणांमध्ये समन्वय असावा. तीनही समकक्ष अधिकाऱ्यांची उपसंचालकांनी बैठक घ्यावी. त्यांचा अहवाल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून कंत्राटी पद भरतीबाबत निर्णय घ्यावा. तेथूनच पदभरतीबाबत प्रस्ताव मंजूर करावा, अशा सूचना आरोग्य मंत्री श्री. सावंत यांनी उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाच्या पदभरतीबाबत आयोजित बैठकीत दिल्या.

    लातूर जिल्हा आरोग्य विषयक आढावा

    लातूर येथे नवीन जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीसाठी कृषी विभागाच्या जमिनीचा प्रश्न सोडवावा. त्यासाठी कृषी विभागाने 10 एकर जागेसाठी मागणी केलेले 2.88 कोटी रुपये अनुदान द्यावे. तसेच पुढील जबाबदारी आरोग्य विभागाने घ्यावी. ग्रामीण रुग्णालय अंतर्गत मुरूड ता. लातूर येथे ट्रेामा केअर केंद्राला प्रशासकीय मंजुरीचा प्रस्ताव निकाली काढावा. बाभूळगांव ग्रामीण रुग्णालयात 20 खाटांचे मोतिबिंदू शस्त्रक्रिया युनिटचा प्रस्ताव सादर करावा. तसेच औराद येथील प्राथमिक आरोग्य केंद्र स्थलांतरणाचा प्रस्तावही मार्गी लावावा, अशा सूचना लातूर जिल्हा आरोग्य विषयक बैठकीत मंत्री श्री. सावंत यांनी दिल्या.

    *****

    निलेश तायडे/ससं/

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed