• Sat. Sep 21st, 2024

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा द्वितीय, लोकपसंतीत तृतीय तर सांस्कृतिक स्पर्धेतील द्वितीय पुरस्कार प्रदान

ByMH LIVE NEWS

Jan 31, 2023
महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा द्वितीय, लोकपसंतीत तृतीय तर सांस्कृतिक स्पर्धेतील द्वितीय पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली, दि. 31 : प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर झालेल्या पथसंचलनात महाराष्ट्राच्या वतीने ‘साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती’ हा चित्ररथ साकारण्यात आला होता. या चित्ररथास  केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा द्वितीय, लोकपसंतीचा तृतीय पुरस्कार आज प्रदान करण्यात आला. याशिवाय  आंतरराज्य सांस्कृतिक स्पर्धेत राज्याने द्वितीय क्रमांक पटकावला होता, अशा एकूण तीन श्रेणीतील पुरस्कारांनी यावर्षी महाराष्ट्राला सन्मानित करण्यात आले.

येथील छावणी परिसरातील रंगशाळेत केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्यावतीने पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा पुरस्कार सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वीकारला. उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला अनुक्रमे प्रथम आणि तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  पुरस्कार प्रदान सोहळ्यात आंतरराज्य सांस्कृतिक पुरस्कार विजेत्या राज्यांची नृत्य सादर करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्राने ‘धनगरी’ लोककला प्रकारातील नृत्य सादर केले. त्याला द्वितीय पुरस्कार मिळाला.

असा होता राज्याचा चित्ररथ

महाराष्ट्राने ‘साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती’ चा महिमा चित्ररथाच्या माध्यमातून दर्शविला. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकामाता ही तीन पूर्ण शक्तीपीठे, तर वणीची सप्तश्रृंगी या अर्ध्या शक्तिपीठांचे दर्शन घडविण्यात आले होते. उच्चस्तरीय समितीने निकषांच्या आधारे राज्याच्या चित्ररथाला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर केला होता.

आतापर्यंत राज्याच्या चित्ररथाला मिळालेले पुरस्कार

सन 1970 मध्ये राज्याने प्रथम चित्ररथ सादर केला होता. राजधानीतील मुख्य पथसंचलनाच्या कार्यक्रमात राज्याच्या वैभवशाली ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक इतिहास चित्ररथाच्या माध्यमातून दर्शविले आहे.

राज्याला सन 1981, 1983, 1993, 1994, 1995, 2015, 2018 असे एकूण 7 वेळेस प्रथम पुरस्कार पटकाविलेला आहे.  सन 1993 ते  1995 असे सलग तीन वर्ष  प्रथम पुरस्कार पटकावून विक्रम नोंदविलेला आहे. सन 1986, 1988,2009 असे तीन वेळेस द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळविला आहे. सन 2007 व 2017 मध्ये तिसरा क्रमांक राज्याने पटकावला होता. मागील वर्षी 2022 मध्ये लोकप्रिय चित्ररथाच्या श्रेणीत राज्याने प्रथम क्रमांक मिळविला होता. यावर्षी चित्ररथाला दुसरा आणि लोक पसंती या श्रेणीत तिसरा पुरस्कार मिळालेला आहे. असे एकूण 14 पुरस्कार आतापर्यंत राज्याला प्राप्त झाले आहेत.

00000

अंजु निमसरकर/वि.वृ.क्र. 25 /दि.3१.01.2023

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed