• Thu. Jun 25th, 2026

    विज्ञानप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे नागपूरमधील भारतीय विज्ञान काँग्रेस ठरली संस्मरणीय – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jan 7, 2023
    विज्ञानप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे नागपूरमधील भारतीय विज्ञान काँग्रेस ठरली संस्मरणीय – महासंवाद

    नागपूर,  दि.  7 – येथे गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेल्या भारतीय  विज्ञान काँग्रेसचा समारोप आज झाला. एक लाखांहून अधिक विज्ञानप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे नागपूरने यजमानपद भूषविलेली 108 वी भारतीय विज्ञान काँग्रेस संस्मरणीय ठरली. नागपूर विद्यापीठाच्या शंभराव्या वर्षातील भारतीय विज्ञान काँग्रेसचे आयोजन ही अनोखी भेट ठरली.

    येथील राष्ट्र्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात  दि.3 ते 7 जानेवारी या कालावधीत आयोजित विज्ञान काँग्रेस मध्ये विविध विज्ञान आधारित कार्यक्रम, परिसंवाद, चर्चासत्र, नोबेल पारितोषिक विजेत्या वैज्ञानिक प्रा. ॲडा योनाथ यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. यात 27 परिसंवाद, बाल, महिला, शेतकरी व आदिवासी विज्ञान काँग्रेसचा समावेश आहे. यंदा प्रथमच आदिवासी विज्ञान काँग्रेसचे आयोजन करण्यात आले होते.  पाच दिवस चाललेल्या या विज्ञान परिषदेतला विज्ञानप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आज समारोपाला कानपुरवरून नागपूर येथे दाखल झालेल्या विज्ञान ज्योतीला विज्ञान काँग्रेसच्या अध्यक्षा डॅा. विजयलक्ष्मी सक्सेना यांनी डॅा. अरविंद सक्सेना यांना विज्ञानज्योत सोपवून अधिकृत समारोप जाहीर केला.

     

    27 परिसंवादांचे आयोजन

    विज्ञानप्रेमींसाठी पर्वणी ठरणाऱ्या या परिषदेत एकूण 27 परिसंवादांचे आयोजन करण्यात आले. सर्वच विषयांवर सखोल चर्चा झाली. अनेक दिग्गजांचा यात सहभाग होता. भारताची 2030 मधील वाटचाल,अंतराळ विज्ञान  आणि  तंत्रज्ञान,  कोविड आजारानंतर दिसून  येणारे परिणाम, कर्करोग, पुरुष प्रजनन संदर्भातील संशोधन यासह विविध विषयांवर परिसंवादांचे आयोजन  करण्यात आले होते.  देश -विदेशातील  अनेक संशोधक,  वैज्ञानिक या परिषदेत सहभागी झाले होते.

     बाल विज्ञान प्रदर्शन

    बाल विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन ‘निरी’चे माजी संचालक डॉ.सतीश वाटे यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सभामंडपात हे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. 10 ते 17 वर्षे वयोगटातील बालवैज्ञानिकांचे विविध प्रयोग येथे प्रदर्शित करण्यात आले आहेत.  देशभरातील सर्वच भागातून आलेल्या बालकांची या प्रदर्शनाला उपस्थिती लावली .

    महिला विज्ञान काँग्रेस

               महिला विज्ञान  काँग्रेसचे आयोजन करण्यात आले. विज्ञानाच्या सहाय्याने शाश्वत विकासाचे ध्येय प्राप्त करण्यात महिलांचे योगदान महत्वपूर्ण आहे. महिलांनो आता स्वयंस्फूर्तीने विज्ञानक्षेत्रात भरारी घ्या आणि आकाश कवेत घ्या, असे आवाहन यावेळी करण्यात आले.   पद्मश्री  राहीबाई पोपेरे यांनीही आपले विचार यारदम्यान व्यक्त केले. असंख्य वाटचालींवर मात  करीत  केलेली वाटचाल त्यांनी यावेळी कथन केली.

    प्रथमच आदिवासी विज्ञान काँग्रेसचे आयोजन

    भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये पहिल्यांदाच आदिवासी विज्ञान काँग्रेसचे आयोजन करण्यात  आले होते. शहीद बिरसा मुंडा सभागृहात आदिवासी विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना यांच्या हस्ते  झाले. भारतीय विज्ञान काँग्रेसचे महासचिव डॉ.ए. रामकृष्ण, नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे,अधिष्ठाता डॉ. राजू हिवसे आणि आदिवासी विज्ञान काँग्रेसचे संयोजक डॉ.श्याम कोरेट्टी मंचावर उपस्थित होते. आदिवासींनी विकसित केलेल्या तंत्राचा उपयोग शेती आणि औषध निर्मिती क्षेत्रात व्हावा, असा या आदिवासी विज्ञान काँग्रेसमधील सूर होता.

    शेतकरी विज्ञान काँग्रेस

    देश धान्य उत्पादनात खुप पुढे गेला आहे. यामागे शेतकऱ्यांची फार मोठी मेहनत आहे. मात्र, अजूनही शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती फार सुधारली नसल्याचे दिसून येते. शेती व्यवसायाच्या प्रगतीसाठी आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर महत्वाचा आहे. शेतकऱ्यांनी बाजारतंत्रही अवगत करणे आवश्यक असल्याचा शेतकरी विज्ञान काँग्रेस परिषदेतील सूर होता.

    ‘प्राईड इंडिया एक्सपो’ विशेष आकर्षण

    प्राईड इंडिया एक्सपो हे या प्रदर्शनातील विशेष आकर्षण ठरले. या एक्सपो मध्ये अनेक विज्ञानविषयक स्टॅाल लावण्यात आले. यास विज्ञानप्रेमींची गर्दी पहायला मिळाली. दररोज सायंकाळी सहा ते आठ या वेळेत  विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात  आले.  यात गझल संध्या, स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित नाट्य, स्वरानंदन या कार्यक्रमांचा  प्रामुख्याने समावेश आहे. पुरातत्व विभाग संग्रहालय, पॅलेस आन व्हिल्स ही गाडी, ॲालिम्पिकच्या धर्तीवर विज्ञान ज्योत,  बाल वैज्ञनिकांच्या विविध प्रयोगांचे प्रदर्शन  या संमेलनात  पहावयास मिळाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed