• Sat. Sep 21st, 2024

५५१ रुग्णांवर मोतिबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया; पूर्णपणे अंध झालेल्या ६२ रुग्णांना मिळाली नवी दृष्टी – पालकमंत्री संजय राठोड

ByMH LIVE NEWS

Dec 1, 2022
५५१ रुग्णांवर मोतिबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया; पूर्णपणे अंध झालेल्या ६२ रुग्णांना मिळाली नवी दृष्टी – पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ, दि:१ डिसेंबर : पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने आनंदवन येथे शस्त्रक्रिया करण्यासाठी येत असल्याचे कळताच त्यांना विनंती करून यवतमाळ जिल्ह्यातील रुग्णांची शस्त्रक्रिया करण्याची विनंती केली. समाजाच्या तळागाळातील अगदी गरीब व्यक्तींची त्यांनी अशा शिबिरातून शस्त्रक्रिया केली आहे. जिल्ह्यातील ५५१ लोकांच्या  शस्त्रक्रिया त्यांनी पूर्ण केल्या. या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कायम त्यांच्या ऋणात राहीन, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

स्व. वसंतराव नाईक वैद्यकीय महविद्यालयात मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या समारोपप्रसंगी झालेल्या रुग्णांशी संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, डॉ रागिणी पारेख, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, डॉ. सुरेंद्र भुयार व त्यांचा चमू तसेच अधिष्ठाता मिलिंद फुल पाटील उपस्थित होते.

श्री.राठोड म्हणाले, नेत्र शस्त्रक्रियेचा हा पहिला टप्पा आज संपन्न झाला आहे. जिल्ह्यातील एकूण ३ हजार रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण‌्यात येणार आहेत. डॉक्टर लहाने यांना जसा जसा वेळ मिळेल तशा त्या शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात येतील. डोळे हा अतिशय नाजूक भाग आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया केलेल्या सर्व रुग्ग्णांनी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे डोळ्यांची काळजी घ्यावी.

यावेळी बोलताना डॉक्टर लहाने यांनी या शिबिरात पूर्णपणे अंध झालेल्या ६२ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली असल्याचे सांगितले. एका महिलेचे हिमोग्लोबिन पाच असूनही भूल न देता तिचे ऑपरेशन केले. मला कितीही दुखले तरी चालेल पण मला दृष्टी द्या असे जेव्हा ती मला म्हणाली, तेव्हा  वाईट वाटले. त्यामुळे  तिच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. आज तिची दृष्टी परत मिळाल्याचा आनंद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.  या शिबिरासाठी अथक कार्यरत असलेली वैद्यकीय महाविद्यालयाची चमू, डॉ. जळके यांनी 125 च्या वर शस्त्रक्रिया केल्या आहेत, सिव्हिल सर्जन यांची पूर्ण टीम यांचे त्यांनी आभार मानले. तसेच शस्त्रक्रिया केलेल्या सर्व रुग्णांना डोळ्याची निगा कशी राखावी आणि काय काळजी घ्यावी, या संदर्भात मार्गदर्शन केले.

००००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed