मुंबई, दि. 24 : ‘स्मार्ट’ प्रकल्प हा राज्यातील कृषि क्षेत्रासाठी गेम चेंजर असणार आहे. या प्रकल्पादरम्यान विकसित होणाऱ्या लिंकेजेसमुळे शेती आणि शेतकरी अधिक समृद्ध होणार आहे. राज्यातील कृषिक्षेत्र वातावरणीय बदलांना अनुकूल करण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
जागतिक बँकेचे भारतातील संचालक ऑगस्टे तानो कौमे यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची आज राजभवन येथे भेट घेतली, यावेळी ते बोलत होते.
यावेळी शिष्टमंडळातील शबनम सिन्हा, आदर्श कुमार, सुदीप मुजुमदार, झियांग वाँग या सदस्यांसमवेत निवृत्त सनदी अधिकारी प्रवीण परदेशी, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, जलसंपदा विभागाचे सचिव राजन शहा, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक परिमल सिंग आदी यावेळी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, पोक्रा – 2 हा जवळपास 600 मिलियन डॉलर्सच्या गुंतवणूक प्रकल्पाची राज्यात अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा करण्यात आली. कृषि क्षेत्रासाठी राज्यात स्वतंत्र फिडर असून या फिडर्सचे सोलरायझेशन करण्यात येत आहे. कृषि क्षेत्रामध्ये राज्याची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोक्रा) येणाऱ्या गावांमधील देखील कृषि फिडर्स सौर ऊर्जेवर आणण्याचा प्रयत्न आहे .
राज्यात युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून या तरुणांना कौशल्य आधारित शिक्षण देण्यासाठी कौशल्य विकासाशी संबंधित पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणावर भर देण्यात येत आहे. कौशल्य विकास विभागांतर्गत राबवण्यात येणाऱ्या कौशल्य विकासाच्या विविध योजनांची ‘मित्रा’ या संस्थेशी समन्वयाने मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. वातावरणीय बदलामुळे राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये वारंवार पूर येतात, तर काही भागाला अवर्षणाचा सामना करावा लागतो. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुराचे पाणी अवर्षणग्रस्त भागात वळवण्याचा राज्याचा प्रयत्न आहे. त्याअंतर्गत कृष्णा नदी पात्रातील पुराचे पाणी भीमा नदीच्या पात्रात वळवण्याचा विचार आहे. यामुळे भीमा खोऱ्यातील 14 अवर्षणग्रस्त जिल्ह्यांना लाभ होणार आहे. पुरामुळे कोल्हापूर, सांगली भागातील ऊस लागवड क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते, या भागातील कृषि क्षेत्राला ‘स्मार्ट’ प्रकल्पाचा लाभ होऊ शकतो, असेही उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
या बैठकीत महाराष्ट्र कौशल्य विकास प्रकल्प, हवामान बदल आणि त्यामुळे कृषि क्षेत्रावर होणारा परिणाम, बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प, पोक्रा योजना,जलसंपदा प्रकल्प याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
000000
प्रवीण भुरके/ससं