Nana Patole: मध्य नागपूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात दंड थोपटले आहे. नाना संघासाठी काम करतात त्यांना पक्षातून बडतर्फ करून RSS मध्ये पाठवावे असे शेळके यांनी म्हटले आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून काम करत असल्याने त्यांना पक्षातून बडतर्फ करून त्याच संघटनेत पाठवावे, अशी आक्रमक भूमिका घेत मध्य नागपुरातील पक्षाचे पराभूत उमेदवार बंटी शेळके यांनी दंड थोपटले. भ्रष्टाचार, चुकीच्या निर्णय बोला, ‘डरो मत’, ही पक्षाचे नेते राहुल गांधी यांची सूचना आहे. त्यांच्या सूचनेनुसार मी वस्तुस्थिती मांडत आहे, असे बंटी शेळके म्हणाले. दोन दिवसांपूर्वी असंतुष्ट गटाने पटोले यांना लक्ष्य केल्यानंतर शेळकेंच्या आरोपांनी पक्षांतर्गत वाद चिघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गेल्या निवडणुकीत निसटता पराभव झाल्यानंतरही बंटी शेळके यांनी मतदारसंघ सोडला नाही. यावेळी देखील त्यांच्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याची चर्चा होती. उमेदवारांची घोषणा होत असताना मध्य नागपुरातून काँग्रेसकडून इतर उमेदवारांची नावे निश्चित झाल्याची चर्चा होती. अशा स्थितीत शेळके यांनी उमेदवारी खेचून आणत पक्षांतर्गत विरोधकांवर मात केली. निकालानंतर पाच दिवसांनी शेळके यांनी थेट मुंबईतच पटोले यांच्यावर शरसंधान केले.
गेल्या निवडणुकीत चार हजार मतांनी पराभूत झालो. त्या निवडणुकीतही पटोले यांनी पदाधिकाऱ्यांना माझे काम करू नये, अशी सूचना केली होती. नाना पटोले यांनी या निवडणुकीत पॅनलमध्ये नाव नव्हते पाठवले. बहुतांश ब्लॉक अध्यक्ष माझ्या बाजूने नव्हते. दोन महिला अध्यक्ष माझ्या विरोधात नियुक्त केल्या. मध्यतील कुणालाही पद हवे असल्यास माझा विरोध करावा, अशी त्यांची भूमिका राहिली, असा घणाघाती आरोप शेळके यांनी केला.
पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी उमेदवारी दिली. मात्र, असा घात होईल, याची त्यांना कल्पना नव्हती. पक्षाचे चिन्ह असताना माझी अपक्षासारखी स्थिती झाली. संपूर्ण संघटन गायब होते. प्रभारी सुखदेव पानसे, कुणाल चौधरी, महिला अध्यक्ष अलका लांबा यांना सर्व घडामोडींची कल्पना होती. निवडणुकीत बोटावर मोजण्याइतकेच कार्यकर्ते माझ्यासोबत होते. पटोले यांनी इतरांची भाजपशी हातमिळवणी करून दिली होती. प्रियांका गांधी यांचा रोड शो झाला, त्यात पक्षाचे काही योगदान नव्हते, असा दावा बंटी शेळके यांनी केला.