• Thu. Nov 28th, 2024

    बचत गट, लघु उद्योजकांनी उत्पादित केलेल्या मालाला आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

    ByMH LIVE NEWS

    Nov 24, 2022
    बचत गट, लघु उद्योजकांनी उत्पादित केलेल्या मालाला आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

    नवी दिल्ली, 24 : बचत गट, लघु उद्योजकांनी उत्पादित केलेल्या मालाला आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची प्रतिक्रिया स्टॉल धारकांनी दिली.

    येथील प्रगती मैदानात 41 वा आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात सुरूवात 14 नोव्हेंबरपासून झाली आहे. महाराष्ट्र या यावर्षी ‘भागीदार राज्य’ म्हणून सहभागी झाला आहे. महाराष्ट्र दालन हे सर्वसामवेश असे दालन आहे. या दालनात बचत गट, लघु उद्योजक, विविध वस्तू उत्पादन समूह केंद्रांच्यावतीने लावलेला आहे.

    …असे आहे महाराष्ट्र दालन!

    महाराष्ट्र दालनाच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधिष्ठित पुतळा आहे. येथे स्वागतासाठी तुतारी वादक आहेत. विविध विभागाकडून राज्याचा होत असलेला सर्वांगीण विकास दर्शविण्यात आला आहे. दालनाच्या मधल्या भागात इलेक्ट्रिक ऑटो, दुचाकी, भारतीय नौदलाला लागणारे सुटे भाग, फिरत्या पृथ्वीची प्रतिमा, पैठणी परिधान केलेली महिलेची प्रतिमा असे दालनाचे रूप आहे. दालनाच्या बाहेरच्या बाजूस इलेक्ट्रिक चारचाकी वाहन आहे. येथे राज्याच्या उद्योग वाढीचा आलेख दिसत आहे यासोबतच बचत गट, वस्तू उत्पादन समूहाअंतर्गत विविध उत्पादित वस्तूंची  दालने मांडण्यात आलेली आहेत.

    सांगलीची हळद, मनुके, जळगाव जिल्ह्याचे वैशिष्ट्य असणाऱ्या केळींचे विविध पदार्थ, औरंगाबाद जिल्ह्याची साखळी हस्तकला, बंजारा हस्तकला,  कोल्हापूरच्या चपला, दागिने, मुंबईतून आलेल्या समूहाची लेदर बॅग आणि कापडी बॅगचे स्टॉल्स आहेत.

    सांगलीच्या हळदीला, आणि जळगावच्या केळींना भौगोलिक मानाकंन (जियो टॅग) मिळाले आहे. या ठिकाणी असलेल्या या दालनांना ग्राहकांनी विशेष पसंती दिली आहे. उरमेरीक वस्तु उत्पादन समुह (कल्सटर) सांगलीवरून आलेल्या या समुहातील दालनात हळद, मनुके, कांदा लसून चटणी, तीळाची, जवस, नारळाची चिक्की आहे. या सर्व वस्तूंना ग्राहकांची प्रचंड मागणी असल्याचे दिसून येते.

    जळगाव जिल्ह्यातील यावल येथील संकल्प एन्टरप्राईजेसचे अशोक गडे यांनी केळींवर प्रक्रिया करून खाद्य पदार्थ बनविलेले आहेत. यात केळीचे बिस्कीट, चॉकलेट, लाडू आहेत. या पदार्थांचे स्वामित्व (पेटेंट) ही आहेत. येथे व्यापार मेळाव्यात प्रथम आलो आहे. अनेक व्यवसायिकांनी संपर्क साधून दरमहा मोठ्या प्रमाणात माल उपलब्ध करून देण्याची मागणी केली असल्याची माहिती श्री. गडे यांनी दिली.

    या ठिकाणी अभिषेक बंजारा वस्तू उत्पादन समूहाचे स्टॉल आहे. या स्टॉलवर बंजारा समाजाच्या पारंपरिक वेशभूषेतील जुन्या पैश्यांचे दागिने, पॅच वर्क, बॅग्स आहेत. स्टॉल अतिशय सुंदर सजविलेले आहे. विशेष म्हणजे या उत्पादन समूहाकडून प्लाजो-स्कर्ट धोती सारखे बनविले आहे. हा प्लाजो-स्कर्ट मुलींना विशेष आवडत असल्याचे बालाजी पवार यांनी सांगितले.

    शिव समर्थ महिला उद्योग केंद्र, सांगलीच्या सुनंदा म्हेत्रे म्हणाल्या, प्रथमच व्यापार मेळाव्यात स्टॉल उभारण्याची संधी मिळाली, याचा आनंद आहे. देशाच्या राजधानीत मंच मिळवून दिल्याबद्दल शासनाचे आभार मानले, आमच्या दालनात अव्वल दर्जाचा काजू, मनुके, हळद, कोकम हे पदार्थ आहेत. सर्वसामान्य लोकांकडून मालाची खरेदी होत आहे, अशी प्रतिक्रीया श्रीमती म्हेत्रे यांनी दिली.

    हातमागावरील पैठणी बनविण्याचे प्रात्यक्षिक

    महाराष्ट्र लघु विकास महामंडळाच्यावतीने हातमागावरील पैठणी बनविण्याचे प्रात्यक्षिक याठिकाणी सादर करण्यात येत आहे. नंदिनी झुंझे आणि मीनाक्षी वावळ या प्रशिक्षित पैठणी बनविणाऱ्या महिला हे प्रात्यक्षिक करून दाखवित आहेत. या दालनास लोक आर्वजून भेट देत असून प्रात्यक्षिक पाहून पैठणी कशी विणली जाते आणि पैठणी या महावस्त्राबद्दल कुतूहलाने विचारणा केली आहे.

    हे प्रदर्शन दि.27 नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. शनिवारी, 26 नोव्हेंबरला सायंकाळी 5.30 वाजता कोल्हापूर येथील श्रीजा समूहातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम येथील खुल्या सभागृहात सादर केला जाणार आहे.

    ००००

    अंजु निमसरकर/ वि.वृ.क्र. 179 /दि. 24-11-2022

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed