• Sat. Sep 21st, 2024

सर्वांगीण विकासाला चालना देऊन नाशिकला शैक्षणिक हब करणार – पालकमंत्री दादाजी भुसे – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 30, 2022
सर्वांगीण विकासाला चालना देऊन नाशिकला शैक्षणिक हब करणार – पालकमंत्री दादाजी भुसे – महासंवाद

नाशिक, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करतांना कृषी, आरोग्य, शिक्षण व रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार आसून नाशिकला शैक्षणिक हब करण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर विशेष प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

आज जिल्हाधिकारी कार्यालय येथील मध्यवर्ती सभागृहात जिल्ह्यातील विविध शिक्षण संस्थांचे प्रमुख व शिक्षण तज्ज्ञांसमावेत संयुक्त आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्री श्री भुसे बोलत होते. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार सिमा हिरे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनिता धनगर, शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ.मच्छींद्र कदम, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर कनोज, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्यासह जिल्ह्यातील विविध शिक्षण संस्थांचे प्रमुख व शिक्षण तज्ज्ञ तसेच संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास जर साधायचा असेल तर येणाऱ्या पिढीला सक्षम शैक्षणिक मूलभूत सुविधा देणे आवश्यक आहे. त्या अनुषंगानेच जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे व सर्व मुलभूत सोई सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सोईचे होण्यासाठी प्रवासी वाहतुकीची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

दिंडोरी तालुक्यात राखीव जागेवर शैक्षणिक हब

दिंडोरी तालुक्यात 2.50 हेक्टर जागा  शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी राखीव ठेवण्यात आली असून या जागेचा उपयोग शैक्षणिक हब करण्याच्या दृष्टीने करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर सर्व व्यवसायिक आभ्यासक्रमांची सुविधा उपलब्ध असावी यादृष्टीने विशेष प्रयत्न करण्यात येतील, असेही पालकमंत्री श्री भुसे यांनी यावेळी सांगितले.

कोरोना महामारीनंतर आरोग्य सेवेची गरज किती महत्वाची आहे, हे जाणून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत नव्याने वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. तसेच जिल्ह्यात सेंट्रलाईज रिसर्च लॅब व्हावी यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विविध परीक्षा घेण्यात येतता, अशावेळी या परीक्षांसाठी नाशिक जिल्ह्याला परिक्षा केंद्र व्हावे, यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यीनींच्या सुरक्षेसाठी विशेष काळजी घेण्यात येणार असून शाळा व महाविद्यालयाच्या आवारात संरक्षणाच्या दृष्टीने पोलीस यंत्रणेचे सहकार्य घेण्यात येईल. तसेच सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य देण्यात येईल.

शिक्षण संस्थांचे प्रश्न सोडविण्यावर भर

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी शिक्षण विभागातील रिक्तपदे भरण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येणार असून अनुदानित व विनाअनुदानित शिक्षण संस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी भर देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी दिली आहे.

यावेळी बोलतांना खासदार हेमंत गोडसे म्हणाले की, स्पेशल एज्युकेशन झोन म्हणून जिल्ह्याचा विकास केल्यास नाशिकला एक वेगळी ओळख मिळणार आहे. तसेच स्टार्टअपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होत असल्याने त्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे.

000000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed