• Mon. Nov 25th, 2024

    मराठवाडा मुक्तीसंग्रामातील लढ्याचे योगदान सांस्कृतिक विभागामार्फत शेवटच्या घटकापर्यंत पोहाेचविण्याचे कार्य करावे – मंत्री सुधीर मुनगंटीवार – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Sep 17, 2022
    मराठवाडा मुक्तीसंग्रामातील लढ्याचे योगदान सांस्कृतिक विभागामार्फत शेवटच्या घटकापर्यंत पोहाेचविण्याचे कार्य करावे – मंत्री सुधीर मुनगंटीवार – महासंवाद

    मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांच्या छायाचित्राचे, त्यांनी मुक्तीसंग्राम लढ्यात दिलेल्या योगदानाच्या माहितीच्या प्रदर्शनाचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन

    हिंगोली (जिमाका), दि. 17 : मराठवाडा निजामांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या लढ्यात शहीद होऊन आपले आयुष्य समर्पण करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचे कार्य, त्यांचे विचार, त्यांच्या क्रांतीची भावना शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे कार्य करावे, असे प्रतिपादन  राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

    मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त देवडा नगर येथील हुतात्मा स्मारक स्मृतिस्तंभ येथे आयोजित करण्यात आलेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ प्रसंगी श्री. मुनगंटीवार बोलत होते.  यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र सैनिक माणिकराव टाकळगव्हाणकर,  आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, माजी खासदार शिवाजी माने, माजी आमदार रामराव वडकुते, माजी आमदार गजानन घुगे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश कलासागर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

    यावेळी सांस्कृतिक मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, आपला मराठवाडा तीन ज्योतीर्लींग असणारा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचा वारसा सांगणाऱ्या व आई तुळजाभवानी मातेचा मराठवाडा, संतांची भूमी असलेल्या मराठवाड्यावर निजाम रझाकारांच्या माध्यमातून अन्याय-शोषण करत होते, यासाठी मराठवाड्यातील अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपला प्राणप्रिय तिरंगा फडकवावा या भावनेने आपल्या प्राणाची आहुती दिली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या निर्णयाने आपला मराठवाडा 17 सप्टेंबर, 1948 रोजी निजामाच्या जोखडातून मुक्त झाला, असे त्यांनी सागितले.

    मुक्तीसंग्राम स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे कार्य, त्यांचे विचार, त्यांच्या क्रांतीची भावना शेवटच्या घटकापर्यंत तसेच प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहचविण्यासाठी मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यास सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.  यावेळी श्री. मुनगंटीवार यांनी स्वातंत्र्य लढ्यात आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या, रझाकारांविरुध्द आंदोलनाचा झेंडा हाती घेतलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली अर्पण करुन त्यांच्या परिवारासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

    यावेळी श्री. मुनगंटीवार म्हणाले की, 17 सप्टेंबर हा संकल्पाचा दिवस असून यावर्षी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी  वर्षास सुरुवात होत असल्याने मराठवाड्यातील व हिंगोली जिल्ह्यातील जनतेने सर्वसामान्य व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण व्हावे यादृष्टीने जे वाईट गुण असतील ते नष्ट करणे, जे चूक असेल त्याचा प्रतिकार करणे असा संकल्प करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

    प्रारंभी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन  हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी पोलीस पथकाने हुतात्म्यांना शोक धून वाजवून हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली. यावेळी श्री. मुनगंटीवार यांनी  ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक,  लोकप्रतिनिधी,  अधिकारी,   पदाधिकारी,  नागरिक, पत्रकार यांची भेट घेवून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

    यावेळी तेथे आयोजित केलेल्या मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांच्या छायाचित्राचे, त्यांनी मुक्तीसंग्राम लढ्यात दिलेल्या योगदानाच्या माहिती प्रदर्शनाचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

    यावेळी  उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसिलदार नवनाथ वगवाड, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंढे, यांच्यासह  पत्रकार,  नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थीनी, विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.

    *****

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed