• Mon. Nov 25th, 2024

    विद्यापीठाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    ByMH LIVE NEWS

    Sep 16, 2022
    विद्यापीठाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    • छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण उत्साहात

    औरंगाबाद, दि.16, (विमाका) :- छत्रपती शिवाजी महाराज हे प्रजाहित दक्ष, मुत्सद्दी, धोरणी आणि रणधुरंदर होते. त्यासोबतच ते कुशल प्रशासक आणि श्रेष्ठ व्यवस्थापकही होते. अशा या बहुआयामी व्यक्तीमत्व असलेल्या महाराजांचा पुतळा प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील असून त्या दृष्टीने विविध मागण्यांबाबत शासन निश्चितच सकारात्मक भूमिका घेणार असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास उद्योग मंत्री उदय सामंत, कृषि मंत्री अब्दुल सत्तार, रोहयो मंत्री संदीपान भुमरे, सहकार, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार सर्वश्री  प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाठ, नारायण कुचे, कुलगुरू डॉ.प्रमोद येवले, प्र. कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ,  कुलसचिव जयश्री सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.

    देशाच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आणि मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, छत्रपतींच्या काळातील गडकिल्ले, वारसा स्थळे जतन करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यांच्या जतनासाठी शासन प्रयत्नशील आहे. मंत्रीमंडळ निर्मितीची संकल्पनाही महाराजांनीच सुंदर स्वरुपात साकारली. शिवरायांना भारतीय आरमाराचे जनक मानले जाते. भारतीय नौदलास प्रदान करण्यात आलेल्या नव्या ध्वजावर छत्रपतींच्या राजमुद्रेला स्थान देण्यात आले आहे. ही बाब आपल्या सर्वांसाठी अभिमानास्प्द अशी आहे. स्वराज्य, हक्क आणि आपल्या भाषा प्रांतासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा आपल्याला महाराजांकडूनच मिळाली आहे. असे सांगतांना छत्रपतींचे घराणे याच परिसरातील असल्याचा आवर्जून उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला. या पुतळ्याच्या निमित्ताने आपल्या युवा पिढीला मातृभक्ती, राष्टभक्ती आणि मातृभूमीसाठी तन मन अर्पण करण्याची ऊर्जा मिळेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

    विद्यापीठ परिसराचे पावित्र्य सर्वांनी जपावे असे आवाहन करुन मुख्यमंत्री म्हणाले, या परिसरात मराठवाड्याच्या भूमिला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीकारी आणि परिवर्तनशील विचारांचाही वारसा लाभला आहे. याच भूमीत बाबासाहेबांनी शैक्षणिक चळवळीचे रोपटे लावले आहे. त्यांच्याच कर्मभूमीत त्यांच्याच नावाने विभूषित झालेल्या या विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षणाचा वटवृक्ष विस्तारला आहे. या विद्यापीठाच्या गुणवत्तावाढीसाठी विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. गेल्या दोन महिन्यात आपल्या सरकारने जवळपास 450 नवीन निर्णय घेतले असून अमृत महोत्सवी वर्षात 75 हजार पदांची भरती करण्यात येणार आहे. त्यात प्राध्यापकांनाही न्याय मिळेल असे त्यांनी यावेळी सांगितले.

    महाराजांच्या पुतळ्याची उभारणी झाल्याबद्दल आनंद व्यक्त करुन उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले की, या निमित्ताने मराठवाड्यासाठी दोन महत्वाचे संकल्प पूर्ण झाल्याचा मला विशेष आनंद होत आहे. यापूर्वी पैठणचे संतपीठ साकारले आणि आज या पुतळ्याची उभारणी झाली. महाराष्ट्र हे खऱ्या अर्थाने संस्कृती जपणारे राज्य आहे. ही प्रतिमा अशा कृतीतून साकारली जात आहे. विद्यापीठ जागतिक दर्जाचे होण्यासाठी सर्व घटकांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

    कुलगुरू डॉ.येवले म्हणाले, छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले तर डॉ. बाबासाहेबांच्या लेखणीने क्रांती घडवली. या दोन्ही महापुरुषांचे पुतळे विद्यापीठ परिसरात असणे ही विद्यापीठासाठी गौरवशाली बाब आहे.  आजच्या काळात छत्रपती शिवरायांच्या विचारांची नितांत आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठातील हा पुतळा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल असे सांगून पैठण येथील संत विद्यापीठ  स्वायत्त असावे अशी अपेक्षा व्यक्त केली. कोविड काळात विद्यापीठाने दिलेल्या योगदानाचा त्यांनी यावेळी विशेष उल्लेख केला.

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र, सामाजिक शास्त्र संकुल, अध्यासन केंद्र संकुल, प्रवेशद्वार सुशोभिकरण, विद्यापीठ नामांतर लढ्यात प्राणाची आहुती दिलेल्यांचे शहीद स्मारक, विद्यार्थी वसतिगृह आदी कामांसाठी 110 कोटी रुपयांचा निधी यासोबतच प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी पदभरती होण्याची अपेक्षा कुलगुरूंनी व्यक्त केली.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान इंगळे आणि नीता पानसरे यांनी केले. महाराजांचा पूर्णाकृती पुतळ्याची निर्मिती करणारे नरेंद्र सोळुंके आणि उभारणीत योगदान देणारे अतुल निकम यांचा सत्कार मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed