• Wed. Sep 23rd, 2026

शेतकऱ्यांनी उत्पादनवाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा मंडळ कृषी अधिकारी सुरज गावडे – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 21, 2026

नाशिक, दि. २१ सप्टेंबर: शेतकऱ्यांच्या आर्थिक व कृषी विकासासाठी शासनामार्फत विविध योजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेत आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. त्यातून उत्पादनवाढीसोबतच शेती अधिक फायदेशीर करण्यास मदत होईल, असे आवाहन मंडळ कृषी अधिकारी सुरज गावडे यांनी केले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक यांच्यावतीने शासकीय योजना, उपक्रम व लोककल्याणकारी कार्यक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘लोकसंवाद २०२६’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत मालेगाव तालुक्यातील दाभाडी ग्रामपंचायत कार्यालयात जिल्हा माहिती कार्यालय व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकसंवाद २०२६’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी सुरज गावडे मार्गदर्शन करत होते.

कार्यक्रमास कृषी अधिकारी (गुण नियंत्रण निरीक्षक) शुभम नाजीरकर, उपसंपादक किरण डोळस, दाभाडीचे सरपंच प्रमोद निकम, जिजामाता कृषी भूषण पुरस्कार विजेत्या भावना निकम, कृषी सहाय्यक काजल बस्ते यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी व महिला शेतकरी उपस्थित होते.यावेळी मंडळ कृषी अधिकारी सुरज गावडे यांनी पोकरा योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध घटकांची माहिती दिली. यामध्ये फळबाग लागवड, सूक्ष्म सिंचन, शेततळे, गांडूळ खत युनिट, पंपसेट, बांबू लागवड, रेशीम उद्योग, वनवृक्ष लागवड, शेडनेटमधील लागवड, कांदा साठवणूक, व्हिडमॅट तसेच फार्मगेट पॅक हाऊस आदी योजनांचा समावेश आहे. या योजनांचे निकष, पात्रता व उपलब्ध लाभ याबाबत त्यांनी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

कृषी अधिकारी (गुण नियंत्रण निरीक्षक) शुभम नाजीरकर यांनी ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणालीची माहिती दिली. या प्रणालीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या परिसरात आवश्यक असलेले खत कोणत्या दुकानात उपलब्ध आहे, याची माहिती मिळणार आहे. तसेच बुकिंग केलेल्या दुकानावर क्यूआर कोड दाखवून खताची उचल करता येणार आहे. त्यामुळे खत वितरण प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुलभ होण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घेऊन आवश्यकतेनुसार व शिफारशीनुसार अनुदानित खतांची खरेदी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed