• Tue. Sep 22nd, 2026

दुष्काळसदृश्य परिस्थितीत बाधित मच्छिमारांना मदतीसाठी माहिती संकलीत करण्याचे निर्देश – मंत्री नितेश राणे – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 21, 2026

सिंधुदुर्ग, दि. २१ : राज्यातील काही भागात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय विभागाशी संबंधित तलाव, जलाशय व इतर जलसाठ्यांची पाहणी करून संभाव्य नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.

मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयातून राज्यातील सर्व सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांची ऑनलाइन बैठक घेण्यात आली. यावेळी मंत्रालय, मुंबई येथून मत्स्य आयुक्त भानुदास पालवे तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यांचे सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय त्या त्या जिल्ह्यातून ऑनलाइन उपस्थित होते.

मंत्री नितेश राणे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व विभागांना दुष्काळसदृश्य परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक माहिती संकलित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने मत्स्यव्यवसाय विभागानेही आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व तलाव, जलाशय व मत्स्यशेतीच्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ माहिती संकलित करावी.

प्रत्येक जिल्ह्यातील सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांनी संबंधित तलाव व जलाशयांना प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील सद्यस्थितीची माहिती घ्यावी. तसेच स्थानिक मच्छिमारांशी संवाद साधून दुष्काळसदृश्य परिस्थितीचा मत्स्यव्यवसायावर होणारा परिणाम जाणून घ्यावा. प्रत्येक जिल्ह्यातील एकूण तलावांची संख्या, सद्यस्थितीतील पाणीसाठा, संभाव्य बाधित तलाव तसेच संबंधित तालुक्यांची माहिती तातडीने संकलित करावी, असे निर्देश त्यांनी दिले.मत्स्यशेतीला कृषीचा दर्जा मिळाला असून, शेतीच्या नुकसानीबरोबरच मत्स्यव्यवसाय करणाऱ्या बाधित मच्छिमारांनाही आवश्यक मदत मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व संभाव्य बाधित मच्छिमारांची माहिती संकलित करून ती जिल्हा प्रशासनास सादर करावी, असेही मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले. माहिती संकलन व प्रत्यक्ष पाहणी करताना संबंधित मच्छिमारांशी संवेदनशीलतेने संवाद साधावा. शासनाकडून आवश्यक ती मदत मिळण्यासाठी कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती देऊन त्यांना दिलासा द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी आपण स्वतःही विविध भागांचा दौरा करणार असून, राज्यातील बाधित मच्छिमारांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही मंत्री नितेश राणे यांनी यावेळी दिली.

बैठकीदरम्यान मंत्री नितेश राणे यांनी जिल्हानिहाय मत्स्यव्यवसायाशी संबंधित तलावांची संख्या, उपलब्ध पाणीसाठा, संभाव्य बाधित तलाव तसेच बाधित होण्याची शक्यता असलेले तालुके याबाबत माहिती घेतली. दुष्काळसदृश्य परिस्थितीचा मत्स्यव्यवसायावर होणारा परिणाम लक्षात घेऊन प्रशासनाने आवश्यक ती पूर्वतयारी ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed