शहरातील विविध भागांत पोलिसांनी वाहनांची तपासणी करताना थार, बीएमडब्ल्यू, डिफेंडर, फॉर्च्युनर यांसारख्या महागड्या वाहनांवर अशोकस्तंभ आणि आमदारकी दर्शविणारे लोगो लावल्याचे आढळून आले. काही वाहनांवर हा लोगो मागील बाजूस, तर काही वाहनांच्या पुढील काचेवर लावण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
आमदाराचा लोगो नेमका कशासाठी?
वाहनांवर अशा प्रकारचे लोगो का लावले, याबाबत संबंधित चालकांकडे पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी केवळ आर्थिक फायदा व्हावा, वाहनाला विशेष वागणूक मिळावी, या उद्देशाने लोगो लावल्याचे काही चालकांनी सांगितल्याचे पोलिसांच्या कारवाईतील माहितीतून समोर आले आहे. विशेष म्हणजे, पोलिसांनी अधिकृत परवानगी किंवा संबंधित कागदपत्रांबाबत विचारणा केली असता लोगो वाहनावर लावण्यासाठी कोणतेही अधिकृत कागदपत्र नसल्याचे समोर आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर अशा वाहनांवर कारवाई करण्यात येत असून, वाहनचालकांसह मालकांचीही चौकशी केली जात आहे.
एका कारवाईत धक्कादायक माहिती
13 सप्टेंबर रोजी भोसेरी वाहतूक शाखेच्या हद्दीत एका फेटल अपघाताच्या तपासणीदरम्यान पोलिसांच्या निदर्शनास (MH 47 VU 2398) क्रमांकाचे वाहन आले. वाहनाच्या मागील बाजूस महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आणि मध्यभागी अशोकस्तंभ असलेला लोगो लावण्यात आल्याचे पोलिसांना आढळले. चालकाची चौकशी केली असता, आर्थिक फायदे आणि व्हीआयपी सूट मिळावी म्हणून हा लोगो लावण्यात आल्याचे सांगण्यात आल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद आहे. तसेच, लोगो लावण्यासंदर्भात कोणतेही अधिकृत कागदपत्र नसल्याचेही चालकाने सांगितल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी मोटार वाहन कायदा कलमानुसार कारवाई करण्यात आली आहे.
‘लोगो’ की ‘राजकीय दबावाचे कवच’?
आमदाराचा लोगो वाहनावर लावण्यामागे जर केवळ राजकीय दबदबा निर्माण करणे आणि सामान्य वाहनचालकांपेक्षा वेगळी वागणूक मिळवणे हा उद्देश असेल, तर हा प्रकार गंभीर असल्याचे बोलले जात आहे. रस्त्यावर नियम सर्वांसाठी समान असताना, वाहनावर आमदाराचा लोगो लावून ‘आपल्याला कोणी अडवणार नाही’, असा समज निर्माण करण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याला आळा घालणे गरजेचे आहे. आमदार हा जनतेचा लोकप्रतिनिधी असतो; त्यांच्या नावाचा किंवा पदाचा वापर करून वैयक्तिक फायदा मिळवण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याची गंभीर दखल घेतली जाणे अपेक्षित आहे.
कार्यकर्त्यांच्या ‘व्हीआयपी कल्चर’ ला ब्रेक लागणार?
आमदारांच्या जवळचे असल्याचे दाखवण्यासाठी वाहनांवर आमदारांचे नाव, पद आणि अशोकस्तंभाचे लोगो लावण्याची ‘फॅशन’ राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. महागडी गाडी, त्यावर आमदाराचा लोगो आणि रस्त्यावर वेगळीच दहशत, असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न काही जणांकडून होत असल्याची चर्चा आहे. पिंपरी- चिंचवड वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईमुळे अशा प्रकारे लोगो लावून फिरणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये आता खळबळ उडाली आहे. कार्यकर्त्यांच्या अशा ‘लाडक्या’ उद्योगांकडे दुर्लक्ष करणारे लोकप्रतिनिधी यापुढे त्यांना लगाम घालणार का? कारण आमदारकीचा लोगो हा जनसेवेची ओळख असावी, वैयक्तिक दबदबा किंवा व्हीआयपी सवलत मिळवण्याचे साधन नव्हे, अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.
“अशा प्रकारे वाहनांवर लोकप्रतिनिधींचा लोगो वापरू नये. अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. मग तो कुणीही असो, त्याच्यावर कारवाई होणारच. अशा प्रकारे लोगोचा वापर करणे हा गुन्हा आहे,” असं वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी म्हटलं आहे.