• Fri. Sep 11th, 2026

‘येवा येवा शिरी गनेस देवा’ मधून कोकणच्या लोकसंस्कृतीचा जागर – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 11, 2026

मुंबई, दि. ११ : गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त महाराष्ट्राच्या विविध भागांतील लोकपरंपरा, लोककला आणि सांस्कृतिक वारसा रसिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने ‘येवा येवा शिरी गनेस देवा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार, २० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता छत्रपती शिवाजी मंदिर, दादर, मुंबई येथे हा कार्यक्रम होणार आहे.

मालवणी मुलुखातील गणेशोत्सवाची गीत, संगीत आणि पारंपरिक लोककलांच्या माध्यमातून अनुभूती या कार्यक्रमातून रसिकांना घेता येणार आहे. गीत रचना व संहिता महेश केळुसकर, संगीत मिथिलेश पाटणकर आणि अभिसंवाद सुप्रिया विनोद मंगेश सातपुते यांचे आहे. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून गावचे भजन सादर करण्यात येणार आहे.

श्री दत्तगुरु प्रासादिक भजन मंडळ, कणकवली यांच्याकडून भजनाचे सादरीकरण करण्यात येणार असून बुवा उदय पारकर भजन सादर करणार आहेत. पखवाजावर श्लोक चव्हाण साथसंगत करणार आहेत. तसेच घागरी फुंकणे, टिपऱ्या आणि फुगड्या या पारंपरिक लोककला प्रकारांचा आविष्कार स्वयंसिद्धा महिला मंडळ सादर करणार आहे.

या सादरीकरणातून मालवणी मुलखातील गणेशोत्सवाची वैशिष्ट्यपूर्ण गीतपरंपरा, भक्तिसंगीत आणि पारंपरिक लोककलांचे दर्शन घडणार आहे. कोकणातील गणेशोत्सवातील भक्ती, उत्साह आणि लोकपरंपरेचा समृद्ध अनुभव मुंबईकर रसिकांना या कार्यक्रमातून घेता येणार आहे.

हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांतील लोककला, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे जतन, संवर्धन व प्रसार करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

‘येवा येवा शिरी गनेस देवा’ हा कार्यक्रम कोकणच्या लोकजीवनातील भक्ती, संगीत आणि पारंपरिक कलांचा संगम घडविणारा ठरणार आहे. कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

००००

संजय ओरके/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed