• Fri. Sep 11th, 2026

Pune Crime: पुण्यात खासगी कंपनीला धमकावून ५ कोटींच्या खंडणीची मागणी; २५ लाख घ्यायला गेले अन् अलगद अडकले, चौघांना अटक

श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी-चिंचवड: औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक, व्यावसायिक आणि विविध आस्थापनांना धमकावून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात पिंपरी- चिंचवड पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. खंडणीखोरीविरोधात शून्य सहनशीलता धोरण स्वीकारण्यात आले असून, अशा गुन्हेगारी प्रवृत्तींना कोणतीही सहानुभूती अथवा सहनशीलता दाखवली जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा पोलीस आयुक्त विणयकुमार चौबे यांनी दिला आहे. एमआयडीसी भोसरी परिसरातील एका खासगी कंपनीच्या व्यक्तीला धमकावून तब्बल ५ कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या आणि त्यापैकी २५ लाख रुपये स्वीकारणाऱ्या चार आरोपींना खंडणीविरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे. या कारवाईमुळे औद्योगिक क्षेत्रात दहशत निर्माण करून खंडणी वसूल करणाऱ्यांना पोलिसांनी मोठा दणका दिला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी एम.आय.डी.सी परिसरातील एका खासगी कंपनीच्या व्यक्तीला आरोपींनी कंपनीची कागदपत्रे काढल्याचे सांगत धमकावले. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन ५ कोटी रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर खंडणीच्या रकमेपैकी २५ लाख रुपये स्वीकारण्यासाठी आरोपी आले असता पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राहुल प्रेमनारायण मिश्रा (वय ३८), अल्ताफ उस्मान जानवेकर (वय ४३), रमेश भिमा मांजरेकर (वय ३९) आणि सुनील राजेंद्र कानू (वय ३४) यांचा समावेश आहे. यातील आरोपी सुनील कानू याच्या ताब्यातील चारचाकी वाहनातून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर खंडणीच्या रकमेबाबत अधिक तपास करण्यात आला. या प्रकरणातील इतर आरोपींची भूमिका तसेच खंडणीच्या कटामागील कारणांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

“औद्योगिक क्षेत्रात खंडणीखोरीला थारा नाही”

औद्योगिक परिसरातील कोणत्याही उद्योजक, व्यावसायिक किंवा आस्थापनावर दबाव आणून पैसे मागणे, धमकी देणे, जबरदस्ती करणे, दहशत निर्माण करणे अथवा गुन्हेगारी टोळ्यांच्या माध्यमातून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करणे कदापि सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिला आहे. अशा प्रकारच्या घटनांमध्ये दोषी व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहिता आणि इतर लागू कायद्यांनुसार कठोर कारवाई केली जाणार आहे.

“औद्योगिक विकासाला अडथळा आणणारी कोणतीही गुन्हेगारी प्रवृत्ती खपवून घेतली जाणार नाही. उद्योजक आणि व्यावसायिकांनी कोणत्याही दबावाला किंवा धमकीला बळी न पडता अशा घटनांची तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी,” असे पिंपरी- चिंचवड पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

खंडणीची मागणी झाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा

खंडणीसंदर्भात कोणत्याही प्रकारची धमकी, दबाव किंवा पैशांची मागणी झाल्यास नागरिकांनी आणि उद्योजकांनी घाबरून न जाता तात्काळ खंडणीविरोधी पथक किंवा गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

खंडणीविरोधी पथक गुन्हे शाखा हेल्पलाईन : ७५१७-७५१७-५९३

पिंपरी- चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शिवाजीकुमार महादेवकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड आणि पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहित पवार यांनी केले. कारवाईत खंडणीविरोधी पथक, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.