• Fri. Sep 11th, 2026

Nagpur News: यंदा राजकीय नेत्यांचे बडगे हरवले, पण सामाजिक प्रश्नांवर प्रहार; निळ्या ड्रमची सर्वत्र चर्चा, पाकवरही हल्लाबोल

नागपूर : नागपूरच्या ऐतिहासिक मारबत मिरवणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी राजकीय नेते, राजकीय पक्ष आणि सरकारच्या निर्णयांवर बडग्यांच्या माध्यमातून होणारे बोचरे प्रहार. त्यामुळे मिरवणुकीत यंदा कोणत्या नेत्यावर किंवा कोणत्या राजकीय निर्णयावर बडगा निघणार, याची नागपूरकरांना उत्सुकता असते. मात्र, यंदाच्या मारबत मिरवणुकीत राजकीय नेत्यांत बडगेच हरवलेले दिसले. कोणत्याही राजकीय नेत्यावर, पक्षावर किंवा सरकारच्या निर्णयावर थेट टीका करणारा ठळक राजकीय बडगा दिसून आला नाही. त्यामुळे यंदाच्या बडग्यांनी राजकारणाऐवजी सामाजिक, आर्थिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांकडे आपला मोर्चा वळवल्याचे चित्र दिसले.

मारबत उत्सव म्हटला की बडग्यांची चर्चा होणारच. वर्षभरात देश-विदेशात घडलेल्या घटना आणि सामान्य नागरिकांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या प्रश्नांना बडग्यांच्या माध्यमातून प्रतीकात्मक रूप दिले जाते. जनतेच्या मनातील असंतोष, संताप आणि प्रश्न मांडण्याचे प्रभावी माध्यम मानले जाते. वर्षभरात देशात आणि जगात घडलेल्या अशा घटना, ज्यांचा थेट किंवा अप्रत्यक्ष परिणाम सामान्य नागरिकांच्या जीवनावर होतो, त्यावर बडग्यांच्या माध्यमातून मार्मिक भाष्य केले जाते. त्यामुळे मारबत मिरवणूक ही नागपूरच्या लोकभावनेचा आरसा ठरते. सूचक फलक, उपरोधिक घोषवाक्ये आणि प्रतिकात्मक पुतळ्यांमधून संबंधित विषयावर भाष्य केले जाते. त्यामुळे बडगे हे नागपूरच्या लोकभावनेचे प्रभावी व्यासपीठ मानले जाते.

यंदा राजकीय नेते टार्गेटवर नाहीत!

मारबत उत्सवातील बडग्यांची परंपरा पाहता दरवर्षी एखादा राजकीय नेता, पक्ष किंवा सरकारच्या निर्णयावर थेट अथवा अप्रत्यक्षपणे टोला लगावणारे बडगे हमखास चर्चेत असतात. त्यामुळे यंदा कोणत्या नेत्यावर बडगा निघणार, कोणत्या निर्णयाची खिल्ली उडवली जाणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले होते. मात्र, यंदा राजकारण्यांना थेट लक्ष्य करणारे बडगे तुलनेने दिसले नाहीत. राजकीय व्यक्तींपेक्षा समाजातील प्रश्न आणि देश-विदेशातील घडामोडींना बडग्यांमधून अधिक प्राधान्य देण्यात आले.

पाकिस्तानचे फिल्ड मार्शल आणि लष्करप्रमुख सय्यद आसिम मुनीरवर ‘फेल्ड मार्शल’चा टोला

यंदाच्या मिरवणुकीत पाकिस्तानचे फिल्ड मार्शल आणि लष्करप्रमुख सय्यद आसिम मुनीर यांच्यावरही बडग्याच्या माध्यमातून जोरदार टोला लगावण्यात आला. मस्कासाथ येथील छत्रपती शिवाजी पार्क बडग्या उत्सव समितीने पाकिस्तानचे लष्करप्रमुख फिल्ड मार्शल सय्यद आसिम मुनीर यांच्यावर टीका करणारा बडग्या तयार केला आहे. या बडग्यावर ‘फेल्ड मार्शल’ आणि ‘फेल कमाल, बलूचिस्तान में बुरा हाल’ अशा उपरोधिक घोषणा करण्यात आल्या आहेत. पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्वावर आणि बलुचिस्तानमधील परिस्थितीवर या माध्यमातून भाष्य करण्यात आले. यासोबतच पाकिस्तानचा निषेध करणारे इतर बडगेही मिरवणुकीत सहभागी झाले.

‘निळा ड्रम’ने मेरठ हत्याकांडाची आठवण

यंदाच्या मिरवणुकीतील विशेष आकर्षण ठरलेल्या बडग्यांमध्ये निळा ड्रमचा समावेश आहे. मार्च २०२५ मध्ये मेरठ येथे पत्नीने प्रियकराच्या मदतीने मर्चंट नेव्हीतील पतीची हत्या करून मृतदेहाचे तुकडे सिमेंटच्या निळ्या ड्रममध्ये लपविल्याची घटना समोर आली होती. या धक्कादायक हत्याकांडातून वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा निषेध करण्याचा प्रयत्न या प्रतिकात्मक बडग्यातून करण्यात आला आहे. त्यामुळे हा बडगा सामाजिक संदेश देणारा ठरला.

‘मोबाईलवाली बुवा’पासून महागाई-बेरोजगारीपर्यंत

मोबाईलच्या अतिवापरावर आणि विशेषतः लहान मुलांच्या हातात वाढत्या मोबाईल वापरावर भाष्य करणारा ‘मोबाईलवाली बुवा’ हा बडगाही आकर्षण ठरला. डिजिटल साधनांचा वाढता वापर, त्याचा दुरुपयोग आणि बदलती सामाजिक सवय याकडे या बडग्याने लक्ष वेधले. याशिवाय वाढती महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार यांसारख्या प्रश्नांवरही बडगे काढण्यात आले.

इंग्रजांच्या काळापासूनची परंपरा

बडग्यांची परंपरा स्वातंत्र्यपूर्व काळाशी जोडली जाते. इंग्रजांच्या राजवटीत थेट विरोध व्यक्त करण्यावर मर्यादा असताना प्रतीकात्मक पुतळे आणि उपहासात्मक बडग्यांच्या माध्यमातून जनतेचा रोष व्यक्त केला जात असे. नागपूरच्या भोसले राजघराण्यातील बाकाबाई यांनी इंग्रजांशी हातमिळवणी केल्याच्या निषेधातून काळी मारबत आणि त्यासोबत बडग्यांची परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते.

काळानुसार बडग्यांचे स्वरूप बदलले, मात्र व्यवस्थेतील त्रुटी, सामाजिक प्रश्न आणि जनतेच्या भावनांना वाचा फोडण्याची भूमिका कायम राहिली. दरवर्षी राजकीय टोमण्यांमुळे चर्चेत राहणाऱ्या बडग्यांनी यंदा मात्र राजकीय नेत्यांना मोठ्या प्रमाणात वगळून जनतेच्या दैनंदिन प्रश्नांना आणि देश-विदेशातील घडामोडींना लक्ष्य केले. त्यामुळे ‘राजकीय नेत्यांत बडगे हरवलेले’ असले तरी जनतेच्या मनातील प्रश्न मांडणारी बडग्यांची परंपरा मात्र यंदाही कायम राहिली.