• Thu. Sep 10th, 2026

ब्रिटनच्या संसदेत दुमदुमला ‘जय महाराष्ट्र’चा निनाद – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 9, 2026

  • आई-पत्नीच्या काबाडकष्टातून सामाजिक विचारांची जडणघडण
  • करोडो बहिणींना स्वावलंबी केले हाऊस ऑफ लॉर्डसमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लंडन दिनांक ९ : जगभरातील नेत्यांच्या आवाजाने दुमदुमलेल्या ब्रिटनच्या संसदेतील वरिष्ठ सभागृह हाऊस ऑफ लॉर्डसमध्ये आज ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. निमित्त होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रदान करण्यात आलेल्या ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ या प्रतिष्ठेच्या सन्मानाचे. उपमुख्यमंत्र्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि पुढच्याच क्षणी या ऐतिहासिक सभागृहात मराठी भाषेचा एकच गजर झाला. विशेष म्हणजे यावेळी आपल्या भाषणाची सुरुवात ‘नमस्कार- जय महाराष्ट्र’ अशी मराठीतून करून एकनाथ शिंदे यांनी भाषेचा अभिमान तर व्यक्त केलाच, पण महाराष्ट्राच्या विकासाची कहाणीही मांडली. आई-पत्नीच्या काबाडकष्टांतून सर्वसामान्यांसाठी काम करण्याची माझी विचारसरणी घडली असे जेव्हा त्यांनी सांगितले तेव्हा संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. मुंबई आणि लंडन ही दोन्ही महत्त्वाची वित्तीय केंद्रे असून फिनटेक, ग्रीन एनर्जी, ग्रीन हायड्रोजन, डीप-टेक आणि कौशल्य विकास क्षेत्रात महाराष्ट्र-ब्रिटन सहकार्याला मोठी संधी असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

यूके एशियन बिझनेस कौन्सिल आणि ‘कॅनव्हास फॉर केअर क्रिएटिव्ह आर्ट कॅम्पस’ यांच्या संयुक्त विद्यमाने हाऊस ऑफ लॉर्ड्स येथे हा पार पडलेल्या या सोहळ्यात उत्तर आयर्लंडच्या माजी फर्स्ट मिनिस्टर ऑनरेबल बॅरोनेस आर्लेन फॉस्टर आणि यूके एशियन बिझनेस कौन्सिलचे चेअरमन अँड्र्यू ग्रोकॉक,  कौन्सिलचे उपाध्यक्ष सुदीप सकाळे त्याचप्रमाणे संसदेच्या सभागृहांचे सदस्य, ब्रिटनचे वरिष्ठ मंत्री, महापौर, विविध देशांचे राजदूत, जागतिक उद्योजक आणि कॉमनवेल्थ देशांतील मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदी असताना आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून राबवलेल्या नागरिक-केंद्री, पारदर्शक आणि नाविन्यपूर्ण प्रशासन पद्धतीसाठी हा बहुमान त्यांना देण्यात आला विशेषत: त्यांच्या काळातील महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठीची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, नागरिकांना शासकीय सेवा थेट घरापर्यंत पोहोचवणारा ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम या प्रमुख योजना राबविण्यासाठी त्यांना गौरविण्यात येत असल्याचे त्यांच्या मानपत्रात म्हटले आहे.

महाराष्ट्रातील जनतेच्या कष्टाचा गौरव

छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची संकल्पना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक न्यायाचा विचार आणि सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवणारे प्रशासन – या त्रिसूत्रीवर महाराष्ट्राची विकासयात्रा उभी असल्याचे आपल्या भाषणात सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा पुरस्कार महाराष्ट्रातील जनतेच्या कष्टांचा, त्यांच्या आकांक्षांचा आणि राज्याच्या विकासाच्या वाटचालीचा गौरव असल्याचे स्पष्ट केले.

‘लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी… जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी…’ या कवी सुरेश भट यांच्या ओळी उद्धृत करत एकनाथ शिंदे यांनी आपल्या मातृभाषेतून महाराष्ट्राची ओळख जगासमोर मांडली.

मोदी भारताचे व्हिजनरी आणि डायनॅमिक लीडर

ब्रिटनच्या संसदेत महाराष्ट्राच्या विकासाची गाथा मांडताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले की नरेंद्र मोदी हे भारताचे व्हिजनरी आणि डायनॅमिक लीडर आहेत. त्यांना जगातील ३६ हून अधिक देशांनी सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी सन्मानित केले असून मोदींच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक नेतृत्वाच्या दिशेने वाटचाल करीत आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भारत-ब्रिटन संबंध नव्या सुवर्ण युगात

भारत-ब्रिटन संबंध नव्या सुवर्णयुगात प्रवेश करत असल्याचे सांगताना पंतप्रधान मोदींनी सांगितलेल्या वसुधैव कुटुंबकम् या विचारधारेची शक्ती असल्याचे ते म्हणाले. ब्रिटनमध्ये राहणारे ७० हजारांहून अधिक महाराष्ट्रीय नागरिक हे भारत-ब्रिटन संबंधातील महत्त्वाचा मानवी दुवा असल्याचेही ते म्हणाले.

आईपत्नीच्या कष्टांनी शिकविले

माझ्या आयुष्याची सुरुवात अगदी लहान अशा शेतकरी कुटुंबात झाली, मी कुठल्याही मोठ्या सुखवस्तू घराण्यात जन्माला आलो नाही. माझी आई आणि पत्नी यांना मी दिवसरात्र कुठलीही तक्रार न करता काबाडकष्ट करतांना पाहिलं आहे, त्यामुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यातले अश्रू मला माहिती आहेत. या अनुभवातूनच मी शिकलो असे सांगून उपमुख्यमंत्री म्हणाले की, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आणि नागरिकांना सरकारी सेवा त्यांच्या दारात उपलब्ध करून देणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांचा त्यांनी भाषणात विशेष उल्लेख केला. मला माझी एक बहिण आहे पण लाडकी बहिण योजनेमुळे करोडो बहिणी मला मिळाल्या आहेत, असे त्यांनी टाळ्यांच्या गजरात सांगितले.

लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळत असून त्याचा परिणाम कुटुंबाच्या आरोग्य, पोषण आणि मुलांच्या शिक्षणावर होत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘शासन आपल्या दारी’च्या माध्यमातून राज्यातील गावागावांत सरकारी सेवा पोहोचवण्यात आल्या असून पाच कोटींहून अधिक नागरिकांना विविध कागदपत्रे, प्रमाणपत्रे आणि कल्याणकारी योजनांचे लाभ मिळाल्याचा दावा त्यांनी केला.

दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग, ट्रान्सजेंडर धोरण, मुलींच्या उच्च शिक्षणासाठी सरकारी मदत आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून गरजू नागरिकांना मदत अशा सामाजिक उपक्रमांचाही त्यांनी उल्लेख केला.

नागरिकांना सन्मानाने जगता यावे

आपल्या भाषणात ते म्हणाले की, विकास म्हणजे केवळ रस्ते, पूल, मेट्रो किंवा उंच इमारती नव्हेत; विकास म्हणजे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत संधी पोहोचवणे आणि प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगता येणे आणि यासाठीच आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’, ‘शासन आपल्या दारी’, मुलींच्या उच्च शिक्षणासाठी मदत, दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग, ट्रान्सजेंडर धोरण आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता अशा योजना प्रभावीरीत्या राबविल्या असे ते म्हणाले.

महाराष्ट्राच्या विकासाचा वेग

महाराष्ट्र हे भारताचे औद्योगिक आणि आर्थिक पॉवरहाऊस असल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचा भारताच्या जीडीपीमध्ये सुमारे १४ टक्के वाटा असून देशातील थेट परकीय गुंतवणुकीपैकी ३० टक्क्यांहून अधिक गुंतवणूक महाराष्ट्र आकर्षित करीत असल्याचे सांगितले.

वाढवण बंदरापासून समृद्धी महामार्ग, अटल कोस्टल ब्रिज आणि मुंबई कोस्टल रोडपर्यंतच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा उल्लेख करताना महाराष्ट्र वेगाने पुढे जात असल्याचे ते म्हणाले. २०३० पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरची करण्याचे लक्ष्य असल्याचेही त्यांनी जाहीर केले. ब्रिटिश उद्योगांना महाराष्ट्रात गुंतवणुकीचे निमंत्रण देताना ग्रीन एनर्जी, सस्टेनेबल इन्फ्रास्ट्रक्चर, फिनटेक, डीप-टेक, शिक्षण आणि कौशल्य विकास या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र आणि लंडन यांच्यात सहकार्याची मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले.

‘मी एक सामान्य माणूस आहे’, हा आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातील दृष्टिकोन आजही कायम असल्याचे सांगत त्यांनी सामान्य माणसासाठी काम करण्याची आपली बांधिलकीही आपल्या भाषणातून व्यक्त केली.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed