• Thu. Sep 10th, 2026

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वास्तूंची जतन-संवर्धनाची कामे दर्जेदार करावीत – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 9, 2026

मुंबई, दि. ९ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई’ अंतर्गत शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहांच्या जतन व संवर्धनाची कामे सुनियोजित, दर्जेदार आणि या वास्तूंच्या ऐतिहासिक महत्त्वाला साजेशी व्हावीत, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.

पीपल्स एज्युकेशन सोसायटीसाठी सामाजिक न्याय विभागाने मंजूर केलेल्या ५०० कोटी रुपयांच्या विशेष निधीच्या अनुषंगाने विधानसभा उपाध्यक्ष बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.  सोसायटीच्या माध्यमातून राज्यातील नऊ शैक्षणिक संस्था व दोन वसतिगृहाच्या जतन व संवर्धनाच्या कामांचा व प्रशासकीय मान्यतेचा या बैठकीत आढावा घेण्यात आला.

यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सह सचिव सो. ना. बागूल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सह सचिव पु. प्र. साबणे, वित्त विभागाच्या अवर सचिव शि. भा. भोगटे, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. वासुदेव गाडे व चंद्रशेखर कांबळे आदी उपस्थित होते.

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले, प्रशासकीय मान्यता मिळालेली कामे नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात यावीत. ज्या कामांना अद्याप प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही, त्या प्रस्तावांना प्राधान्याने मान्यता देण्याची कार्यवाही शासनस्तरावर करावी. सामाजिक न्याय विभागाने कामांच्या स्वरुपानुसार मंजूर निधी आणि प्रशासकीय मान्यतेबाबतची माहिती तसेच इतर अनुषंगिक बाबींसाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटीशी समन्वय साधावा. तसेच शैक्षणिक संस्था आणि वसतिगृहांच्या नियोजित कामांचा सद्यस्थिती अहवाल पुढील बैठकीत सादर करावा, असे निर्देश बनसोडे यांनी दिले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्था आणि वसतिगृहे हा ऐतिहासिक वारसा आहे. या वास्तूंच्या संवर्धनाच्या माध्यमातून पुढील पिढ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य सदैव प्रेरणा आणि मार्गदर्शन देत राहील. ऐतिहासिक संदर्भांच्या दृष्टीनेही या इमारतींना विशेष महत्त्व आहे. त्यामुळे सर्व संबंधित विभाग आणि संस्थांनी समन्वयातून जतन व संवर्धनाची कामे करावीत, अशा सूचनाही विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी यावेळी दिल्या.

0000

योगेश मोरे/उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed