• Thu. Sep 10th, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मदीक्षेशी संबंधित दुर्मिळ दस्तऐवजांचा नवीन खंड लवकरच प्रकाशित होणार –  मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 9, 2026

मुंबई दि.९  : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे ऐतिहासिक बौद्ध धम्मदीक्षा घेतली. या ऐतिहासिक घटनेशी संबंधित दुर्मिळ पत्रव्यवहार, कागदपत्रे व महत्त्वपूर्ण दस्तऐवज संकलित करून त्यांचा नवीन खंड प्रकाशित करण्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी सूचना दिल्या.

मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक तथा तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, उपसचिव प्रताप लुबाळ, सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे तसेच समितीचे सदस्य सचिव व सदस्य उपस्थित होते.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मदीक्षेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर उपलब्ध असलेला दुर्मिळ पत्रव्यवहार आणि महत्त्वपूर्ण कागदपत्रे संकलित करून त्यांचे जतन करण्याबरोबरच हा ऐतिहासिक ठेवा सर्वांसमोर आणण्याच्या दृष्टीने नवीन खंड प्रकाशित करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे काम अधिक गतीने पूर्ण करून नवीन खंड  दिनांक 20 ऑक्टोबर 2026 रोजी दसऱ्याच्या दिवशी प्रकाशित करण्याच्या सूचना मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आणि सामाजिक परिवर्तनाच्या कार्याचा दस्तऐवजी इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा दुर्मिळ साहित्याचे संकलन, संवर्धन आणि प्रकाशन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या माध्यमातून नागपूर येथील ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्याशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण संदर्भ अभ्यासक, संशोधक आणि नागरिकांना उपलब्ध होणार आहेत.

000

काशीबाई थोरात/विसंअ

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed