• Wed. Sep 9th, 2026

पाथरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची कामे तातडीने सुरू करा – राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 8, 2026

मुंबई, दि. ८ : परभणी जिल्ह्यातील पाथरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी उपलब्ध निधीनुसार विकासकामांना तातडीने सुरुवात करून ती कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावीत. आराखड्याची अंमलबजावणी करताना आवश्यक भूसंपादनासह अनुषंगिक कामेही विहित कालमर्यादेत पूर्ण करून पाथरी तीर्थक्षेत्राचा एकात्मिक, नियोजनबद्ध आणि सर्वंकष विकास साधावा, असे निर्देश वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी दिले.

पाथरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास वाढीव निधी उपलब्ध करून देण्याबाबत तसेच आराखड्याच्या अंमलबजावणीतील विकासकामांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी वित्त राज्यमंत्री ॲड. जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

पाथरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. आमदार सईद खान, नगराध्यक्ष आसेफ खान, परभणीचे जिल्हाधिकारी (दूरदृश्य संवादप्रणालीद्वारे), जिल्हा नियोजन अधिकारी उमेश वाघमारे, पाथरी देवस्थानाचे प्रतिनिधी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल म्हणाले, राज्यातील नामांकित तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यांचा अभ्यास करून पाथरी तीर्थक्षेत्रासाठी सर्वंकष आणि एकात्मिक विकास आराखडा तयार करावा. आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या जागेचे भूसंपादन आणि त्यासंबंधित कामे प्राधान्याने व कालमर्यादेत पूर्ण करावीत. भूसंपादनासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्यास त्याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करून शासनास सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले.

भूसंपादन करण्यात आलेल्या जागेवर अतिक्रमण होणार नाही, याची स्थानिक प्रशासनाने काटेकोरपणे दक्षता घ्यावी. तसेच मंदिर ट्रस्टकडे उपलब्ध असलेल्या जमिनींचे योग्य नियोजन करून त्यांचा तीर्थक्षेत्र विकासासाठी प्रभावीपणे वापर करावा. देवस्थानाची आर्थिक बाजू अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना आखाव्यात. देवस्थानाच्या उत्पन्नवाढीच्या माध्यमांचा अभ्यास करून त्यातून उपलब्ध होणारा निधी देवस्थानाच्या विकासासाठी वापरण्याच्या शक्यतांचा विचार करावा, असेही त्यांनी सांगितले.

पाथरी तीर्थक्षेत्राचा विकास करताना भाविकांसाठी आवश्यक सुविधा, भक्तनिवास, प्रसादालय, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, परिसर विकास यांसह आवश्यक पायाभूत सुविधांचे नियोजन करावे. तसेच देवस्थानाच्या दीर्घकालीन गरजा विचारात घेऊन त्यांचा विकास आराखड्यात समावेश करावा. विकास आराखड्यातील कामे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी दिले.

000

योगेश मोरे/उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed