• Wed. Sep 9th, 2026

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ८० वर्षीय वृद्धेस पाहून गाड्यांचा ताफा थांबवला – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 7, 2026

सातारा, दि. ६ : पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या संवेदनशील कृतीचा अनुभव सातारकरांनी घेतला. शिवतेज हॉल येथे सातारा जिल्हा पोलिसांच्या गणेशोत्सव आयोजनाच्या बैठकीला संबोधित करून आपल्या निवासस्थानी परतत असताना मंत्री देसाई यांचे लक्ष शिवतीर्थाच्या भिंतीलगत एकाकी बसलेल्या सुमारे ८० वर्षीय वृद्धेकडे लक्ष गेले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपला वाहनताफा थांबवला. खाली उतरत थेट त्यांच्याजवळ जाऊन त्यांनी आस्थेवाईकपणे त्यांची चौकशी केली.


त्यांच्या जवळ जात ‘आजी, तुम्ही कुठून आला? तुमचे गाव कोणते? तुम्हाला कुठे सोडायचे आहे का?’ अशा आपुलकीच्या शब्दांत त्यांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे, ‘तुम्हाला काही खायचे आहे का?’ अशीही विचारणा केली. या प्रसंगाने काहीशा बावरलेल्या आजींनी ‘मी शाहूनगरमध्ये जाते… अंबाबाईचे देऊळ… माझा मुलगा डॉक्टर… दवाखान्यात कामाला आहे,’ एवढेच सांगितले. त्यांची अवस्था लक्षात येताच मंत्री देसाई यांनी तेथे उपस्थित पोलिस यंत्रणेला तातडीने सक्रिय केले. ‘या आजीच्या कुटुंबीयांचा घेऊन त्यांना त्यांच्या घरी सुखरूप सोडा; कुटुंबीय सापडले नाहीत तर शासकीय वृद्धाश्रमात तातडीने व्यवस्था करा,’ असे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले.


दरम्यान, दोन महिला पोलिस कर्मचारी तातडीने तेथे दाखल झाल्या. मात्र, वृद्ध महिलेभोवती पोलिसांचा मोठा गराडा होऊ नये, अशी सूचनाही मंत्री देसाई यांनी केली. त्यांच्याशी संवेदनशीलतेने वागण्याच्या सूचना दिल्या. सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्याशी संपर्क साधून पुढील कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed