• Sun. Aug 2nd, 2026

    वृक्ष लागवड व संवर्धन ही काळाची गरज; प्रत्येकाने पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी स्वीकारावी : मंत्री गिरीश महाजन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Aug 2, 2026
    वृक्ष लागवड व संवर्धन ही काळाची गरज; प्रत्येकाने पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी स्वीकारावी : मंत्री गिरीश महाजन – महासंवाद

    नाशिक, दि. २ : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असताना पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड आणि त्यांचे संवर्धन ही काळाची गरज आहे. केवळ वृक्ष लावून न थांबता ते जगविण्याची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे. विशेषतः युवक आणि विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणाच्या या चळवळीत सक्रिय सहभाग घेत हरित भविष्यासाठी योगदान द्यावे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

    महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात मंत्री महाजन बोलत होते. यावेळी महापौर हिमगौरी आडके-आहेर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महाराष्ट्र विज्ञान विज्ञापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. मिलिंद आवारे आदी उपस्थित होते.

    मंत्री महाजन म्हणाले की, पुढील वर्षी नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देश-विदेशातून सुमारे १० ते १२ कोटी भाविक येणार आहेत. या पार्श्वभूमीवर रस्ते, पूल, पायाभूत सुविधा आणि विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. आज जगभर हवामान बदलाचे गंभीर परिणाम जाणवत आहेत. वाढते तापमान, ग्लोबल वॉर्मिंग, अनियमित पावसाचे चक्र, उष्णतेच्या लाटा आणि बदलते वातावरण ही संपूर्ण जगासमोरील मोठी आव्हाने आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवडी शिवाय पर्याय नाही. वृक्ष लागवड, वृक्षसंवर्धन, जंगलतोड रोखणे आणि प्लास्टिकमुक्त जीवनशैली या चार गोष्टींचा स्वीकार केल्यास पर्यावरण संवर्धनाला मोठी चालना मिळेल. पर्यावरणाचे रक्षण प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी असून प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरात अधिकाधिक वृक्ष लावावेत आणि त्यांचे संगोपन करावे. विद्यार्थी हे देशाचे भविष्य असल्याने त्यांनी पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारून हरित भारत उभारण्यामध्ये योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

    जिल्हाधिकारी श्री प्रसाद म्हणाले की, ही वृक्ष लागवड मोहीम सुमारे १८ आठवडे चालणार असून प्रत्येक रविवारी विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. मंत्री श्री. महाजन यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात विद्यापीठे, महाविद्यालये, कंपन्या, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहेत. दर रविवारी किमान पाच हजार वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात किमान १४ झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प करावा. प्राणवायूची गरज पूर्ण करण्यासाठी वृक्ष महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे ही झाडे जिवंत ठेवणे आणि त्यांचे संगोपन करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

    ००००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed