• Wed. Jul 29th, 2026

    भायखळ्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 28, 2026
    भायखळ्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ – महासंवाद

    मुंबई, दि. २८ : भायखळा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना विविध शासकीय सेवांचा थेट लाभ उपलब्ध करून देत ‘गतिमान प्रशासन’ उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियान झाले. भायखळा येथील पेंग्विन इमारतीच्या तळमजल्यावरील सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

    यावेळी भायखळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज जामसुतकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवनंदा लंगडापुरे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) संजय पाटील, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘ई’ विभागाचे सहाय्यक आयुक्त अनंत कंकाळ, स्थानिक नगरसेविका सोनम जामसुतकर, नगरसेवक रोहिदास लोखंडे, शिबिराचे समन्वयक कमलेश डोके यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.लंगडापुरे यांनी शासनाच्या लोकाभिमुख योजनांची माहिती देत महसूल विभागासह विविध शासकीय विभागांच्या सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रभावी उपक्रम असल्याचे सांगितले. विविध विभागांनी उभारलेल्या स्टॉलना भेट देऊन शासनाच्या योजनांची माहिती घेऊन त्यांचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

    आमदार जामसूतकर यांनी शासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करणारा हा उपक्रम असल्याचे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी प्रशासनाच्या विचारांशी सुसंगत अशा या अभियानामुळे नागरिकांना त्यांच्या हक्काच्या सेवा सुलभपणे उपलब्ध होत असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा लोकाभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून शासनाच्या विविध कल्याणकारी योजना अधिक प्रभावीपणे तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचून सर्वसामान्यांना त्यांचा अधिकाधिक लाभ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या शिबिरात  एकूण ३२ शासकीय विभागांचे माहिती व सेवा स्टॉल उभारण्यात आले होते. विविध शासकीय योजना, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, तक्रार निवारण तसेच विविध सेवांबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून विविध शासकीय सेवा, दाखले, प्रमाणपत्रे आणि योजनांचा लाभ नागरिकांना एकाच छताखाली सुलभपणे उपलब्ध करून देण्यात आला.

    यावेळी ११८ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांअंतर्गत प्रमाणपत्रे, दाखले तसेच अन्य सेवांचे वितरण करण्यात आले. संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग कल्याण, उद्योग विभाग, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन, मुंबई भूमापन विभागाच्या मिळकत पत्रिका व नकाशे, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, अधिवास प्रमाणपत्र, जातीचा दाखला, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रमाणपत्रे, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या गंभीर आजार सहाय्यता योजनेअंतर्गत धनादेश, शिधापत्रिका संबंधित सेवा तसेच नोंदणीकृत पथविक्रेता प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. शासनाच्या विविध योजनांची माहिती, आवश्यक सेवा आणि लाभ सुलभपणे उपलब्ध करून देत लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान प्रशासनाची प्रभावी अंमलबजावणी या शिबिरातून करण्यात आली.

    ॰॰॰

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed