• Tue. Jul 28th, 2026

    ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ नागरिकांसाठी लाभदायी; एका छताखाली २३ शासकीय सेवा – उपजिल्हाधिकारी प्रशांत पानवेकर – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 28, 2026
    ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ नागरिकांसाठी लाभदायी; एका छताखाली २३ शासकीय सेवा – उपजिल्हाधिकारी प्रशांत पानवेकर – महासंवाद

    मुंबई, दि. २८ : महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने शासनाच्या विविध योजना व सेवा तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान’ अंतर्गत १८६ मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. एका छताखाली २३ शासकीय सेवांसह विविध कल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती मुंबई शहर चे उपजिल्हाधिकारी प्रशांत पानवेकर यांनी दिली.

    श्री लक्ष्मीनारायण मंदिर आणि माधवबाग चॅरिटीज येथे आयोजित शिबिरात बोलताना  प्रशांत पानवेकर म्हणाले की, मुंबई शहर जिल्ह्यात एकाच दिवशी तीन ठिकाणी अशी शिबिरे आयोजित करण्यात आली. विविध शासकीय योजनांची माहिती आणि त्यांचा प्रत्यक्ष लाभ एकाच ठिकाणी नागरिकांना मिळणे, हेच या अभियानाचे यश आहे. या उपक्रमाची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही त्यांनी केले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांचा जन्मदिवस; तसेच माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून मुंबई शहर जिल्ह्यामध्ये  २२ जुलै, २०२६ ते ०२ ऑगस्ट, २०२६ या कालावधीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर तर्फे आयोजन करण्यात आले आहे.

    महसूल विभागामार्फत महसुली दाखले, आधार सेवा, दिव्यांग सेवा, संजय गांधी निराधार योजना, रेशन कार्ड विषयक सेवा, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध सेवा आदींसह एकूण २३ शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच रक्तदान शिबिर, नेत्ररोग तपासणी आणि आरोग्य तपासणी अशा सेवाही दिवसभर नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या. यावेळी माजी आमदार अतुल शहा यांनी राज्य शासनाने विविध योजना सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहोचविल्याबद्दल समाधान व्यक्त करत नागरिकांनी शासकीय योजनांचा तसेच रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन केले.

    कार्यक्रमास बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक आकाश पुरोहित, नगरसेविका संपदा मयेकर, नगरसेविका रिटा मकवाना, माजी आमदार अतुल शहा यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात ३४ लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव पांगम यांनी, तर आभार प्रदर्शन तहसीलदार अश्विनी जाधव यांनी केले.

    0000

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed