• Sun. Jul 19th, 2026

    Accident News: पुण्याकडे निघालेल्या दोन तरुणांचा वेगाने केला घात; भीषण अपघातात जागीच मृत्यू, प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?

    Accident News: पुण्याकडे निघालेल्या दोन तरुणांचा वेगाने केला घात; भीषण अपघातात जागीच मृत्यू, प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?

    Chhatrapati Sambhajinagar News: अपघाताचे नेमके कारण काय होते आणि यामध्ये दोष कुणाचा, याबाबत गंगापूर पोलीस अधिक तपास करत आहेत.

    पुण्याकडे निघालेल्या दोन तरुणांचा वेगाने केला घात; भीषण अपघातात जागीच मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्गावर गंगापूरजवळ एका भीषण आणि अत्यंत दुःखद अपघातात जालन्यातील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. समोर धावणाऱ्या आयशर ट्रकला पाठीमागून भरधाव दुचाकीने जोरात धडक दिल्याने हा थरकाप उडवणारा अपघात घडला. ही दुर्दैवी घटना गंगापूर तालुक्यातील भेंडाळा गावाजवळ रॉयल पॅलेस हॉटेलसमोर घडली. या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. रितेश राजेश राठोड (वय २३),अविनाश केशव चव्हाण (वय २४, रा. मंठा जि. जालना) असे मयत झालेल्या तरुणांचं नाव आहे.

    या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, रितेश राठोड आणि अविनाश चव्हाण हे दोघे दुचाकीवरून मंठा जि. जालना तालुक्यातून पुण्याकडे निघाले होते. ते दुचाकीने जालन्याहून पुण्याला जात असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. भेंडाळा गावाजवळ रॉयल पॅलेस हॉटेलसमोर पोहोचताच, महामार्गावरून समोर धावणाऱ्या एका आयशर ट्रकला त्यांच्या भरधाव दुचाकीने पाठीमागून भीषण धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, दुचाकीवरील दोन्ही तरुण जागेवरच कोसळले. अपघाताची माहिती मिळताच गंगापूर येथील रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे आणि अनिकेत मुळक यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने घटनास्थळ गाठले आणि दोन्ही जखमींना गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयातील डॉ. विजय केंद्रे यांनी तपासाअंती दोघांनाही मृत घोषित केले.

    महामार्गावर वाहतूक विस्कळीत; प्रत्यक्षदर्शींचे धक्कादायक दावे

    अपघातानंतर छत्रपती संभाजीनगर-पुणे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाली होती. गंगापूर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती हाताळून वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी अपघाताचा सविस्तर पंचनामा केला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणांची दुचाकी अत्यंत भरधाव वेगात होती आणि ती थेट आयशर ट्रकला पाठीमागून आदळली.