• Thu. Jul 16th, 2026

    Crime News: पाकिस्तानी गँगस्टरचा व्हिडिओ लाइक केला, पिंपरी-चिंचवडमधील पाच जणांना पोलिसांनी उचललं, तपासात काय आढळलं?

    Crime News: पाकिस्तानी गँगस्टरचा व्हिडिओ लाइक केला, पिंपरी-चिंचवडमधील पाच जणांना पोलिसांनी उचललं, तपासात काय आढळलं?

    म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : सोशल मीडियावर पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीकडून करण्यात आलेल्या पोस्ट, व्हिडिओला लाइक करणे पिंपरी-चिंचवड शहरातील पाच जणांना चांगलेच महागात पडले आहे. गँगस्टर भट्टीचे सोशल मीडिया प्रोफाइल लाइक केल्याने पाच जणांची पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखेने कसून चौकशी केली. मात्र, भट्टीबाबत त्यांचा अधिक संपर्क अथवा सहभाग नसल्याने त्यांना पोस्ट, रिल्स, व्हिडिओपासून दूर रहा, अशी समज देऊन सोडून देण्यात आले.

    पाकिस्तानस्थित गुंड आणि दहशतवादी कारवायांशी संबंधित असल्याचा संशय असलेला शहजाद भट्टी याच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या ५० जणांची राज्य दहशतवादविरोधी पथकासह (एटीएस) स्थानिक पोलिसांनी मंगळवारी चौकशी केली.

    चार दिवसांपूर्वी ‘एटीएस’ने राज्यातील विविध शहरांत विशेष मोहीम राबवत सुमारे २०० संशयितांची चौकशी केली होती. त्या तपासातून महाराष्ट्रातील काही तरुण शहजाद भट्टीच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आल्यानंतर पुणे विभागात ही कारवाई करण्यात आली. मंगळवारी सकाळी ‘एटीएस’च्या २२ पथकांनी कोंढवा, येरवडा, विश्रांतवाडी, कोथरूड, पर्वती, तसेच पिंपरी-चिंचवडमधील चाकण, म्हाळुंगे, वाकड, चिखली, आळंदी, कुदळवाडी आणि जिल्ह्यातील शिक्रापूर, शिरूर, रांजणगाव, राजगुरुनगर परिसरात छापे घातले. या कारवाईत ५० जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या मोबाइलमधील चॅट, सोशल मीडिया अकाउंट्स आणि अन्य डिजिटल माहितीची पडताळणी केली जात आहे.

    दरम्यान, भट्टीशी संबंध नसल्याचे स्पष्ट झालेल्यांना सोडून देण्यात आले; तर काही जणांकडे चौकशी उशिरापर्यंत सुरू होती

    तपास यंत्रणांच्या माहितीनु सार, पाकिस्तानमध्ये बसून शहजाद भट्टी भारतातील तरुणांशी संपर्क साधत होता. दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील तपासात त्याचे असे नेटवर्क उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्रातील काही तरुणांशीही त्याचा संपर्क असल्याचे निष्पन्न झाले. ‘एटीएस’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, की ‘देशविघातक कारवायांसाठी देशातील तरुणांना प्रवृत्त करण्याचे प्रयत्न होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही मोहीम हाती घेण्यात आली. ताब्यात घेतलेल्यांच्या चौकशीत गंभीर बाबी आढळल्यास संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.’

    पाकिस्तानातून खात्यात पैसे

    ‘एटीएस’च्या तपासात ताब्यात घेतलेल्या एका तरुणाच्या बँक खात्यात पाकिस्तानमधून पैसे जमा झाल्याची बाब समोर आली आहे. याबाबत सखोल तपास सुरू आहे. भट्टीच्या संपर्कातील अनेक तरुणांमध्ये बेरोजगारांचे प्रमाण अधिक आहे.

    ‘एटीएस’कडून चौकशी

    एकाच वेळी सर्व संशयितांची चौकशी करणे शक्य नसल्याने मुख्य संशयित मानल्या गेलेल्या २३ जणांची चौकशी ‘एटीएस’कडून थेट सुरू करण्यात आली आहे. उर्वरित संशयितांची माहिती पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलिसांकडे देण्यात आली असून, चौकशी अहवाल ‘एटीएस’कडे सादर केला जाईल.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed