• Tue. Sep 1st, 2026

Indian Navy:भारतीय नौदलात आयएनएस निपुण ही निस्तार वर्गातील दुसरी डायव्हिंग सहाय्यक युद्धनौका सोमवारी नवदलाच्या ताफ्यात दाखल झाली.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.खास प्रतिनिधी, मुंबई:अथांग समुद्रात संकटात सापडलेल्या पाणबुडीपर्यंत पोहोचून तातडीने मदतीचा हात देण्याची भारतीय नौदलाची क्षमता आणखी बळकट झाली आहे. खोल समुद्रातील डायव्हिंग, पाण्याखालील हस्तक्षेप आणि पाणबुडी बचावकार्यासाठी सज्ज असलेली ‘ आयएनएस निपुण ’ ही निस्तार वर्गातील दुसरी डायव्हिंग सहाय्यक युद्धनौका सोमवारी नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. मुंबईतील नौदल गोदीत झालेल्या सोहळ्यात नौदलप्रमुख ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांच्या हस्ते नौकेचा ताफ्यात समावेश करण्यात आला.

युद्धनौका देशातच उभारण्याच्या क्षमतेला आणखी बळ

नौदलाचा ध्वज फडकवताच ‘आयएनएस निपुण’ने औपचारिकरीत्या कार्यरत सेवेत प्रवेश केला. नौदलाच्या पश्चिम विभागाचे ध्वजाधिकारी कमांडिंग-इन-चीफ व्हाइस ॲडमिरल संजय वात्सायन यांच्यासह नौदलातील वरिष्ठ अधिकारी, हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडचे प्रतिनिधी, माजी नौदल अधिकारी, मान्यवर आणि युद्धनौकेच्या चमूचे कुटुंबीय या वेळी उपस्थित होते. विशाखापट्टणम येथील हिंदुस्तान शिपयार्डने या नौकेची स्वदेशी रचना आणि बांधणी केली आहे. त्यामुळे अत्याधुनिक आणि तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीच्या युद्धनौका देशातच उभारण्याच्या क्षमतेला आणखी बळ मिळाले आहे.

विशेष डायव्हिंग संकुल

‘आयएनएस निपुण’वर सॅच्युरेशन, हवा आणि हेलिऑक्स डायव्हिंगची सुविधा असून, पाण्याखालील पाहणी आणि हस्तक्षेपासाठी दूरनियंत्रित यंत्रणाही आहे. विशेष डायव्हिंग संकुल, नौकेचे स्थान स्थिर ठेवणारी यंत्रणेमुळे समुद्रात दीर्घकाळ गुंतागुंतीच्या मोहिमा राबवता येणार आहेत.

Maharashtra TimesThane News: ठाण्याला १६.५४ किमी लांबीचा ‘आनंद ग्रीन बेल्ट’; दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या नावावरून आनंदवन उभारण्याचा महापालिकेचा प्रयत्न

पाणबुडी बचावाला बळ

पाणबुडीमधील तांत्रिक बिघाडामुळे ती समुद्राच्या तळाशी अडकल्यास तिच्या बचावासाठी ‘आयएनएस निपुण’ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ‘आयएनएस निस्तार’सोबत मिळून नौदलाची डायव्हिंग, पाण्याखालील हस्तक्षेप, बचाव, जलउद्धार आणि पाणबुडी बचाव क्षमता लक्षणीयरीत्या वाढणार आहे. जगातील मोजक्याच नौदलांकडे असलेली ही विशेष क्षमता आहे. मानवतावादी मदत आणि बचावकार्यासाठीही या युद्धनौकेचा वापर करता येणार आहे.

Maharashtra TimesDadar Railway Station: दादर स्थानकाच्या पूर्व परिसराचा होणार कायापालट ;टॅक्सी, ‘बेस्ट’साठी स्वतंत्र मार्गिका,अनधिकृत बांधकामांवर होणार कारवाई

आत्मनिर्भरतेच्या दिशेने…

‘आयएनएस निपुण’चे आगमन हे आत्मनिर्भरतेच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. नौदल, हिंदुस्तान शिपयार्ड आणि देशातील विविध उद्योगांच्या समन्वयातून ही नौका उभी राहिली आहे. समुद्री चाचण्यांदरम्यान एकाच मोहिमेत तिच्या सर्व जलांतर्गत यंत्रणांनी अपेक्षेप्रमाणेकामगिरी बजावली, हे देशाच्या तांत्रिक आणि अभियांत्रिकी क्षमतेचे द्योतक आहे, असे नौदलप्रमुख ॲडमिरल स्वामिनाथन यांनी सांगितले.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.… आणखी वाचा