Dadar Railway Station:दादर रेल्वे स्टेशन नेहमीच गजबजलेलं असत. प्रवाशांची रेलचेल जास्त असल्याने रिक्षा ,टॅक्सी यांनी रस्ते भरलेले असतात.नागरिकांना याचा त्रास मोठ्या प्रमाणात सहन करावा लागतो.दादरची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई महापालिकेकडून दादर पूर्व स्थानकाच्या बाहेरील परिसरात नवे बदल केले जाणार आहेत.
प्रशासनाकडून अंतिम निर्णय
दादर रेल्वे स्थानकाच्या पूर्व परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. मुंबई महापालिका , स्थानिक लोकप्रतिनिधी, वाहतूक पोलिस आणि मध्य रेल्वे प्रशासनाच्या समन्वयातून हा परिसर अधिक सुटसुटीत, सुरक्षित आणि प्रवासीस्नेही करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यावर लवकरच संबंधित प्रशासनाकडून अंतिम निर्णय होईल.
परिसर मोकळा केला जाणार आहे.
दादर पूर्वेला टॅक्सी, खासगी वाहने, बेस्ट बस तसेच, अनधिकृत टॅक्सी सेवेमुळे नेहमीच वाहतूक कोंडी होते. त्यामुळे वाहनचालकांसोबतच पादचाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागतो. ही समस्या दूर करण्यासाठी स्थानक परिसरात टॅक्सी आणि बेस्ट बससाठी स्वतंत्र मार्गिका, टॅक्सीसाठी स्वतंत्र स्टॅण्ड, प्रवाशांसाठी शेड आणि आसनव्यवस्था उभारण्याचे नियोजन आहे. तसेच, गाळेधारकांनी केलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून परिसर मोकळा केला जाणार आहे.
संबंधित यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली
दादर रेल्वे स्थानक पूर्व आणि आसपासच्या परिसराची नुकतीच संबंधित यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीत ‘एफ उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त, माटुंगा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, माटुंगा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बेस्ट बस वाहतूक व नियोजन विभागाचे अधिकारी, दादर रेल्वे स्थानक व्यवस्थापक तसेच, शिवसेना शिंदे गटाचे स्थानिक नगरसेवक उपस्थित होते.
Mumbai Ganeshotsav 2026: यंदा ‘संतुलना’चे मोल! मुंबईतील गणेशोत्सवात उंच मूर्तींऐवजी तोल सांभाळणाऱ्या, अधांतरी मूर्तींचे आकर्षण
समस्यांचा आढावा घेतला.
दादर रेल्वे स्थानकातून दररोज मोठ्या संख्येने प्रवाशांची ये-जा होते. पूर्वेला स्थानकाबाहेर पडताच नागरिकांना वाहतूक कोंडी, अनधिकृत पार्किंग, रिक्षा-टॅक्सी आणि बसमुळे अडथळ्यांचा सामना करावा लागतो. पादचाऱ्यांना चालण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध राहत नाही. या पार्श्वभूमीवर प्रवाशांचा त्रास, परिसरातील गर्दी आणि सुरक्षिततेशी संबंधित समस्या यांचा संबंधित यंत्रणांनी आढावा घेतला.
Thane News: गणेशोत्सवासाठी एसटीच्या ठाणे विभागाचं खास नियोजन; चाकरमान्यांसाठी २,७५८ बसगाड्या कोकण मार्गावर धावणार ,कालावधी ९ ते १३ सप्टेंबर
टॅक्सीसाठी स्वतंत्र मार्गिका आणि स्टॅण्ड उभारण्याचे नियोजन
मुंबईबाहेरून दादर येथे येणाऱ्या प्रवाशांसाठी सुरक्षित निवारा शेड, सुलभ पादचारी मार्ग, शिस्तबद्ध रिक्षा-टॅक्सी आणि बेस्ट बस व्यवस्था, चांगली कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्यावरही चर्चा झाली. दादर पूर्वेला स्वामीनारायण मंदिरासमोर मोठ्या प्रमाणात टॅक्सींची ये-जा असते. टॅक्सी आणि खासगी वाहनांमध्ये शिस्त नसल्याने वाहतुकीचा बोजवारा उडतो. त्यामुळे टॅक्सीसाठी स्वतंत्र मार्गिका आणि स्टॅण्ड उभारण्याचे नियोजन असल्याचे महापालिकासूत्रांनी सांगितले.
