• Thu. Jul 2nd, 2026

    कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांची चेंबूर येथील टाटा पॉवर प्लांटला भेट – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 2, 2026
    कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांची चेंबूर येथील टाटा पॉवर प्लांटला भेट – महासंवाद

    मुंबई, दि.२: चेंबूर, माहूल रोड येथील टाटा थर्मल पॉवर कंपनीच्या जनरेशन स्टेशनला राज्याचे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी भेट देऊन पाहणी केली. या दौऱ्याचा मुख्य उद्देश प्लांटमधील बॉयलरच्या वापराची प्रत्यक्ष पाहणी करणे आणि औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण व्यवस्थेचा आढावा घेणे होता. यावेळी उपसचिव दीपक पोकळे, बाष्पके संचालक धवल अंतापूरकर, तसेच चिवटे आदी उपस्थित होते.

    टाटा पॉवरचे ट्रॉम्बे प्रमुख आशिष भट यांनी कामगार मंत्र्यांचे स्वागत करून त्यांना प्लांटचे दैनंदिन कामकाज, सध्या भेडसावणारी तांत्रिक आव्हाने आणि त्यावर प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या अत्याधुनिक उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली.

    या भेटीदरम्यान कामगार मंत्र्यांनी प्लांटच्या कामकाजाशी संबंधित विविध क्लिष्ट तांत्रिक आणि व्यावसायिक बाबी सखोलपणे समजून घेतल्या. त्यांनी युनिट क्षमता, उपकरणांची कार्यक्षमता आणि वीज निर्मिती प्रक्रियेत खारट पाणी वापरताना येणाऱ्या अडचणी व आव्हाने याविषयी माहिती घेतली.

    सध्याच्या डिजिटल युगात औद्योगिक क्षेत्राला भेडसावणाऱ्या सायबर धोक्यांची दखल घेत मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी टाटा पॉवरच्या कामकाजावर होणाऱ्या संभाव्य सायबर हल्ल्यांच्या परिणामांबाबत आणि त्यावरील खबरदारीबद्दलही चौकशी केली. प्लांट सुरक्षित ठेवण्यासाठी उभारण्यात आलेल्या मजबूत आणि अद्ययावत सायबर सुरक्षा यंत्रणेची माहिती घेत त्यांनी समाधान व्यक्त केले.

    याशिवाय, वाढत्या पर्यावरणपूरक पर्यायांमुळे भविष्यात निर्माण होणारी परिस्थिती,  ग्रीडवर नवीकरणीय (रिन्यूएबल) ऊर्जा आणि इलेक्ट्रिकल वाहनांच्या (ईव्ही) वाढत्या वापरामुळे होणाऱ्या परिणामांबद्दल चर्चा केली. यावर ट्रॉम्बे प्रमुखांनी स्पष्ट केले की, या बदलांचा औष्णिक (थर्मल) प्लांटवर निश्चितच परिणाम होतो. विशेषतः वीज निर्मिती तांत्रिकदृष्ट्या किमान पातळीवर (तांत्रिक किमान मर्यादेपर्यंत) आणताना काही आव्हाने निर्माण होतात.

    औद्योगिक सुरक्षा आणि कामगारांच्या हिताला प्राधान्य देत प्लांटमधील सुरक्षा मानके अधिक बळकट करण्याच्या सूचना यावेळी कामगार मंत्री अ‍ॅड फुंडकर यांनी प्रशासनाला दिल्या.

    0000

    निलेश तायडे/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed