• Wed. Jul 1st, 2026

    शेतकरी कर्जमुक्ती योजनेला गती! – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 1, 2026
    शेतकरी कर्जमुक्ती योजनेला गती! – महासंवाद

    यवतमाळ, दि.१ (जिमाका): राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ च्या प्रक्रियेला गती आली असून, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, यवतमाळ या बँकेमार्फत एकूण ६४ हजार ८६५ खातेधारकांची माहिती योजनेच्या अधिकृत पोर्टलवर यशस्वीरीत्या अपलोड करण्यात आली आहे.

    सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून  माहिती अपलोडची प्रक्रिया करण्यात आली असून, त्याआधारे पात्र लाभार्थ्यांची माहिती शासनाच्या प्रणालीवर उपलब्ध झाली आहे. यामुळे योजनेच्या पुढील पडताळणी व लाभ वितरण प्रक्रियेला गती मिळण्यास मदत होणार आहे.

    दरम्यान, राष्ट्रीयकृत तसेच खाजगी बँकांकडून अपलोड करण्यात आलेल्या खातेधारकांच्या माहितीचे संकलन व सनियंत्रण हे सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. विविध बँकांकडून प्राप्त माहितीची तांत्रिक पडताळणी, एकत्रीकरण आणि आवश्यक तपासणीची प्रक्रिया शासन स्तरावर सुरू आहे.

    कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना पारदर्शक व अचूक पद्धतीने लाभ मिळावा, यासाठी सर्व बँकांकडील माहिती वेळेत आणि योग्य स्वरूपात पोर्टलवर उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. त्यानुसार इतर बँकांकडील माहितीचे संकलन आणि पडताळणीची प्रक्रिया संबंधित प्राधिकरणामार्फत सुरू आहे.

    शेतकऱ्यांनी योजनेसंदर्भातील शासनाच्या अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा तसेच आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

    000000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed