• Sun. Jun 28th, 2026
    पावसाच्या पुनरागमनाकडे राज्याचं लक्ष, ४८ तासांत कोण-कोणत्या भागांत कोसळणार? हवामान विभागाचा अंदाज जाहीर

    Maharashtra Rain: आठवड्याच्या सुरुवातीला राज्यात सर्वत्र मान्सूनचं आगमन झालं आणि महाराष्ट्राला मोसमी पावसानं झोडपलं होतं. पण हा दिलासा तात्पुरता होता कारण त्यानंतर दोन दिवस तुरळक पावसाची नोंद झाली. आता मान्सून कुठे गायब झाला आणि पुन्हा कधी बरसणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे शहरात दोन दिवस समाधानकारक बरसल्यानंतर पावसाने शुक्रवारी विश्रांती घेतली. दिवसभर ढगाळ वातावरण होते; पण पाऊस पडला नाही. दोन दिवसांच्या तुलनेत तापमानातही वाढ नोंदविण्यात आली. पुढील दोन दिवसांत मात्र, आकाश ढगाळ राहणार असून, हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. रविवारपासून पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचे संकेत हवामानशास्त्रज्ञांनी दिले आहेत.

    पुण्यात तापमान वाढलं

    पुण्यात सोमवारी नैर्ऋत्य मौसमी पावसाचे आगमन झाले. दोन दिवस मध्यवर्ती भागांसह उपनगरांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस बरसला. त्यामुळे पुणेकरांच्या आशा पल्लवित झाल्या. दर वर्षीप्रमाणे जूनमधील पावसाला उशिरा का होईना पावसाला सुरुवात झाली, अशी चर्चा सुरू असताना गुरुवारी दुपार आणि शुक्रवारी दिवसभरात पाऊस पडलाच नाही. दोन दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी तापमानात वाढ होऊन सरासरीच्या तुलनेत चार अंशांनी जास्त कमाल ३४.३ आणि किमान २२.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जिल्ह्यातही पावसाचा जोर ओसरला होता. घाटमाथ्यावर दिवसभरात अधूनमधून सरी बरसल्या.

    हवामानशास्त्र विभागाच्या नोंदींनुसार, पुण्यात २६ जूनपर्यंत सरासरी १२८.९ मिलिमीटर पावसाची नोंद होते. यंदा मान्सूनपूर्व पावसानेही निराशा केली. त्यामुळे आत्तापर्यंत एक ते २६ जून या कालावधीत ४७ मिलिमीटर पाऊस पडला आहे. पुढील चार दिवसांत पाऊस ही तूट भरून काढणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. यंदा देशभर कमी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

    मुंबईत ४८ तास ‘यलो अलर्ट’

    दरम्यान, मुंबईमधील पावसाचा जोर आजपासून पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. मान्सून आगमनानंतर पहिल्याच दिवशी शहरात धो-धो पाऊस कोसळला आणि मुंबईची अक्षरशः तुंबई झाली. पण त्यानंतर दोन दिवस पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पाऊस कुठे गायब झाला असा प्रश्न नागरिकांना पडू लागला. पण हवामान विभागाच्या अंदाजानुसार आठवड्याच्या शेवटी पुन्हा एकदा शहरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजात मुंबईत २७ आणि २८ जून रोजी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे हे दोन दिवस शहरात ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

    शुक्रवारी शहरात तुरळक पावसाची नोंद झाली. त्यामुळे तापमानातसुद्धा पुन्हा वाढ नोंदली गेली. कुलाबा येथे कमाल तापमान ३१.६ अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ येथे ३३.६ अंश सेल्सिअस नोंदलं गेलं. पण गुरुवारी कुलाब्यात कमाल तापमान २८.८ अंश सेल्सिस तर सांताक्रूझमध्ये ३२.२ अंश सेल्सिअस नोंदलं गेलं होतं.

    Maharashtra TimesJamun And Rain: यंदा जांभूळ जास्त म्हणजे पाऊस कमी पडण्याची शक्यता? व्हायरल संदेशामागील वस्तुस्थिती नेमकी काय? जाणून घ्या…

    स्कायमेटचा अंदाज काय सांगतो?

    येत्या २४ तासांत तेलंगण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. एक-दोन वेळा या भागांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा