• Mon. Jun 29th, 2026
    वाद टाळा, शांतता पाळा; कुटुंबीयांचे प्रवाशांना सल्ले, सलगच्या दोन भयावह घटनांनंतर मुंबईकरांचे प्राण कंठाशी

    Mayank Lohar Death Case : पूर्वी वयाने लहान असणाऱ्या प्रवाशांना दारात उभे राहू नका, बसायला जागा द्या, मोबाइल बंद करा असे सल्ले दिले जात असत. परंतु आता प्रवासातही बोलायचे असले तरी बेशिस्तीकडे काणाडोळाच करण्याचा पवित्रा घ्यावा लागत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : कुणी पादचाऱ्याने रस्त्याच्या कडेच्या स्वच्छ भिंतीवर पानाच्या पिचकाऱ्या मारल्या… बसमध्ये सहप्रवासी पुढे सरकण्यास नकार देऊ लागला… रस्त्यात कुणी कचरा टाकताना दिसले… लोकलमध्ये बसण्याच्या जागेवर कुणी चप्पलेसह पाय ठेवले… प्रवासात कुणी मोठ्या आवाजात मोबाइल ऐकू लागला… सामान्यपणे राग येण्याच्या, संताप होण्याच्या या प्रसंगावेळीही आता एकच उत्तर… मौन. पूर्वी वयाने लहान असणाऱ्या प्रवाशांना दारात उभे राहू नका, बसायला जागा द्या, मोबाइल बंद करा असे सल्ले दिले-घेतले जात असत. पण आता प्रवासातही बोलायचे असले तरी बेशिस्तीकडे काणाडोळाच करण्याचा पवित्रा घ्यावा लागत आहे. घरांघरांतून पत्नी पती एकमेकांना, घरातल्या मुलांनाही आता शांततेचा, संयमाचा, दुर्लक्षाचा धडा दिला जात आहे.

    मुंबईकरांमध्ये भीतीची भावना

    फेब्रुवारीमध्ये लोकलप्रवासात झालेली प्राध्यापकाची हत्या आणि परवा मयंक लोहारने गमावलेला जीव… प्रवासात वाढलेल्या या हिंसेने मुंबईकर भयभीत झाले आहेत. थुंकणारे पादचारी, कचरा टाकणारी मंडळी, रांगा मोडणारे महाभाग या साऱ्या बेशिस्तांना आता सहन करायचे आणि जीव वाचवायचा तर मूग गिळून गप्प बसायचे अशी भावना झाली आहे. मुंबईकरांसाठी हा बदल धक्कादायक आणि स्वभावाला मुरड घालण्यास भाग पाडणारा आहे.

    प्रवासी महिलेची बोलकी व्यथा

    ‘परवाच माझा मुलगा आणि मी लोकलने प्रवास करत होतो. एक प्रवासी समोरच्या आसनावर बुटांसह पाय पसरून बसला होता. माझ्या मुलाने त्याला पाय खाली घेण्यास सांगितले, तर वाद सुरू झाला. माझ्या मुलाची बाजू योग्य होती, पण इतर प्रवाशांनी मध्यस्थी केली नाही. त्याच संध्याकाळी मयंक लोहारची लोकलमध्ये हत्या झाल्याची बातमी आली आणि पायाखालची जमीन सरकली. मयंकही माझ्याच मुलाच्या वयाचा होता…’

    डोंबिवलीहून दादरला प्रवास करणाऱ्या एका महिलेची ही प्रतिक्रिया खूप बोलकी आहे. धावत्या लोकलमध्ये झालेल्या मयंकच्या हत्येनंतर आता घरोघरी कॉलेजला जाणाऱ्या मुला-मुलींना, नोकरीधंद्यासाठी बाहेर पडणाऱ्या सर्वच वयाच्या स्त्री-पुरुषांना एकच तंबी मिळत आहे, बोलावेसे वाटले, तरी राग आवरायचा. प्रवासात आता एकच ‘मौन’रागच आळवायचा. मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतील प्रवासात हळदीकुंकू, गरबा, भोंडला, भजने, मेजवान्या साजरे करण्याच्या रम्य कथा सांगणारे पालक मयंक लोहार प्रकरणानंतर हादरले आहेत.
    Maharashtra TimesKetan Agarwal : पूर्ण चौकशीविना लग्न लावू नका, केतनच्या आजोबांकडून भीती व्यक्त; सियाच्या विवाहाची घाई का करताय? गोयलांना दोन ऑप्शन दिलेले

    महिला वर्गांचे लेकरांना शांततेचे धडे

    डोंबिवलीहून मुलुंडला महाविद्यालयात जाणाऱ्या सारंगीचे आईवडील चिपळूणला राहतात. तिच्या आईने तिला फोन करून लोकलमध्येच नाही, तर एकंदरीत कोणाशीच काही भांडू नको, असा सल्ला दिला आहे. ‘माझी आई मला पुन्हा चिपळूणला बोलावून घेत आहे. पण शिक्षण पूर्ण केल्याशिवाय परत कसे जायचे’, असा प्रश्न सारंगी विचारते. मालाडहून दादरला येणाऱ्या निशांतची आई प्रार्थना पगारे या प्रकरणानंतर धास्तवल्या आहेत. ‘पश्चिम रेल्वेवर अशा प्रकारे हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू होण्याची ही दुसरी घटना आहे. मी परवापासून माझ्या मुलाला बाहेर पडताना माझी शपथ घालून सांगतेय की, प्रवास करून कोणाशीही वाद न घालता परत ये’, असे त्या म्हणाल्या.

    शेतकरी कर्जमाफीवरून महायुतीचे नेते भिडले, सभागृहातील वादानंतर बच्चू कडूंची प्रतिक्रिया

    वाद नको, भावंडांचेही सल्ले

    नोकरी करणाऱ्यांनाही घरातून हीच तंबी मिळत आहे. कोलकात्यातून मुंबईत नोकरीनिमित्त आलेली देबप्रिया अंधेरी ते ग्रँट रोड प्रवास करते. ती तिच्या सख्ख्या बहिणीसोबत येथे राहते. तिच्या आईवडिलांनी दोन्ही मुलींना कामाशी काम ठेवण्याचा सल्ला दिला आहे. ‘माझी ताई बेस्टने प्रवास करते. आम्ही दोघी एकमेकांना दोन दिवस हेच बजावत आहोत की, कोणाशीही वाद घालायचा नाही. काही चुकीचे झाले, तरी स्वत: माफी मागायची’, असे आम्ही दोघींनीही ठरवून टाकल्याचे देबप्रिया सांगते.
    Maharashtra TimesSiya Goyal : सोनम जामिनावर सुटली म्हणून सियाची हिंमत वाढली, राजा रघुवंशीच्या आईची पहिली प्रतिक्रिया, पुण्याचा उल्लेख करत म्हणाली…
    ठाणे, कल्याण, बोरिवली, अंधेरी अशा ठिकाणी राहणाऱ्यांना तर त्यांच्या घरून याच लोकल पकडून शांतपणे येण्याचा सल्ला दिला जात आहे. दरवाज्यात उभे न राहता आतल्या बाजूला उभे राहून किंवा शांतपणे बसून या, असे मला माझ्या बायकोने स्पष्ट शब्दात बजावल्याचे कौस्तुभ जोशी यांनी सांगितले.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा