• Thu. Aug 6th, 2026
    बंडखोरीस कारण की… उद्धव नव्हे, ठाकरेसेनेत दोघांच्या हस्तक्षेपाने खासदार नाराज, शिंदेंच्या 40 मिनिटांच्या Video Call ने ट्विस्ट

    Maharashtra Politics : पक्षाच्या कामकाजात संजय राऊत आणि उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा वाढता हस्तक्षेप, हे उबाठामधील पक्षफुटीचे कारण असल्याचे मानले जाते

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : १४ जून रोजी उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर खासदारांची बैठक बोलावली होती, मात्र नऊपैकी केवळ चारच खासदार या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित राहिले. पक्षात पुन्हा मोठी फूट पडत असल्याचे त्यातून स्पष्ट झाले. १६ जून रोजी सहा खासदार दिल्लीला पोहोचले आणि १७ जून रोजी त्यांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. त्याच दिवशी अशी माहिती समोर आली की, संजय दिना पाटील आणि ओमप्रकाश निंबाळकर हे दोन खासदार १८ जून रोजी होणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संसदीय पक्षाच्या बैठकीला परतण्याची शक्यता आहे; मात्र सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘झूम’ कॉन्फरन्स कॉलद्वारे सर्व खासदारांशी संवाद साधला आणि त्यानंतर त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होण्याचे मान्य केले.

    एकनाथ शिंदेंचा हा व्हिडिओ कॉलच निर्णायक ठरला. शिंदेंनी या सहा खासदारांना आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा उमेदवारीचे आश्वासन तर दिलेच, पण त्यांच्या भविष्यातील सुरक्षिततेची हमीही दिली. हे सर्व खासदार आज, २० जून रोजी एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची साथ का सोडली, याचे स्पष्टीकरण देणारे निवेदनही जारी करणार आहेत. तसेच शिंदेंचे पुढील लक्ष्य ठाकरे गटातील तीन विधान परिषद आमदार आणि मुंबई महापालिकेतील सर्व ६५ नगरसेवक असल्याचेही सूत्रांकडून समजते.

    खासदारांमधील नाराजीचे कारण काय?

    १. पक्षाच्या कामकाजात संजय राऊत आणि उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा हस्तक्षेप, हे उबाठामधील पक्षफुटीचे कारण असल्याचे ‘दैनिक भास्कर’च्या वृत्तात म्हटले आहे. बंडखोर खासदारांच्या मते, इतर नेत्यांशी संजय राऊत यांचे वागणे अयोग्य असते; तरीही त्यांच्याविरुद्धची कोणतीही टीका किंवा तक्रार ऐकून घेण्यास उद्धव ठाकरे तयार नसतात.

    Sanjay Raut

    २. खासदारांना त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी मिळत नाही. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बैठका घेण्याची आणि मतदारसंघांना भेटी देण्याची विनंती पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे करुनही त्याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.

    दिल्लीत दाखल झालेले ठाकरे गटाचे सहा बंडखोर खासदार एकनाथ शिंदे यांच्या सतत संपर्कात होते. शिंदेंनी त्यांच्याशी सुमारे ४० मिनिटे चर्चा केली. ‘तुमच्या प्रत्येक निर्णयात मी तुमच्या पाठीशी उभा राहीन’ अशी ग्वाही एकनाथ शिंदेंनी दिल्याची माहिती आहे.
    Maharashtra TimesOmraje Nimbalkar : पवनराजे केसमधील सर्व आरोपी निर्दोष, ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया समोर, राजकीय निर्णयाबाबत थेट भाष्य

    शिंदेंकडून आश्वासनं

    बंडखोर खासदारांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा, आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवारीची हमी आणि त्यांच्या मतदारसंघांतील विकासासाठी पुरेसा निधी देण्याचे आश्वासन देण्यात आले. शिंदे यांच्याशी झालेल्या वैयक्तिक चर्चेनंतर, ठाकरे गट सोडण्याचा या खासदारांचा निर्धार अधिकच दृढ झाला.

    संजय राऊत पक्षातील सर्वात ताकदवान नेते आहेत, म्हणून उद्धव ठाकरे त्यांच्याविरोधात काही ऐकून घेत नाहीत. संजय राऊत कोणालाही काहीही बोलतात, असंही बंडखोर खासदारांचं म्हणणं आहे. ‘प्रत्येक निर्णयात रश्मी ठाकरेंचा सहभाग असतो. उद्धव यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आधी त्यांची परवानगी घ्यावी लागते. रश्मी ठाकरे जरी ‘सामना’च्या संपादक असल्या आणि त्यांच्याकडे पक्षाचे कोणतेही अधिकृत पद नसले, तरी पक्षात त्यांचा दबदबा तितकाच मोठा आहे.’ असं खासदारांनी म्हटल्याचं वृत्त ‘दैनिक भास्कर’ने दिलं आहे.

    ऑपरेशन टायगरमध्ये नाव, ओमराजे नॉट रिचेबल; गोवर्धनवाडीतील घराबाहेर पोलीस बंदोबस्त

    खासदारांसाठी मंजूर केलेला २ कोटी रुपयांचा निधी थेट त्यांच्या खात्यात जमा केला जात नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी निधीला मंजुरी दिल्याशिवाय खासदार आपल्या मतदारसंघात कोणतेही काम करुन घेऊ शकत नाहीत. जर काही कामच झाले नाही, तर भविष्यात मतं कशी मिळणार? असा सवाल खासदार विचारतात.

    विधान परिषद आमदारांवरही डोळा

    २०२३ मध्येच उद्धव ठाकरेंच्या पक्षातील तीन विधान परिषद आमदारांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे; आता उद्धव ठाकरे यांच्यासह केवळ चारच विधान परिषद आमदार शिल्लक राहिले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, आणखी तीन आमदारांना आपल्या गटात ओढण्याची योजना आखली गेली आहे. ठाकरेंचे दोन आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असून आगामी एक-दोन महिन्यांत नवीन राजकीय समीकरणे उदयास येऊ शकतात.
    Maharashtra TimesRevati Sule VIDEO : रेवती सुळेंच्या संगीत सोहळ्यात शाहरुख खानचा धमाकेदार डान्स, नववधूने आनंदाने मिठीच मारली

    उद्धवसेनेतील बंडखोरीने फडणवीसांना धक्का?

    महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक १३ जागा जिंकल्या. भाजप आणि शिवसेना (उबाठा) यांनी प्रत्येकी ९ जागा जिंकल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाने ८ आणि शिवसेना (शिंदे गट) केवळ ७ जागा जिंकू शकली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाला एक जागा मिळाली आणि एका अपक्ष उमेदवारानेही विजय मिळवला. परिणामी शिंदे यांची शिवसेना पाचव्या स्थानावर आहे. जर उद्धव ठाकरेंच्या गटातील सहा खासदार शिंदे गटात सामील झाले, तर शिंदे गट आणि काँग्रेसच्या खासदारांची संख्या समसमान १३ इतकी होईल.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा