• Sat. Jun 20th, 2026
    Ratnagiri News: कोकणातही तुकाराम मुंढेंचा धडाका! 60 हॉटेल्सची झडती, गुटखामाफियांवर कारवाई; आता स्वीट मार्ट, बेकरी दुकाने रडारवर

    FDA Action In Ratnagiri Kokan: कोकणातही मुंढे पॅटर्नचा दणका पाहायला मिळाला आहे. रत्नागिरीतील ६० हॉटेल्सवर एफडीएची धडक कारवाई झाली आहे, यापैकी अनेकांना नोटिसा बजावण्यात आल्य़ा आहेत. यावेळी नेमकं काय आढळलं?

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    प्रसाद रानडे, रत्नागिरी: अन्न व औषध प्रशासनाचे धडाकेबाज आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपल्या पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर अवघ्या राज्यात कारवाईचा धमाका सुरू केला आहे. कोकणातही अन्न भेसळ औषध प्रशासनाचे अधिकाऱ्यांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मुंढे यांच्या कडक आदेशानंतर रत्नागिरीतील अन्न व औषध प्रशासनाकडून अवैध गुटखामाफिया आणि नियमबाह्य हॉटेल चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. आठ ठिकाणी छापे टाकून सहा लाखांचा गुटखा जप्त केला असून, ६० हॉटेलची झडती घेण्यात आली. त्यातील चार जणांना सुधारणा करण्याबाबत नोटिसा बजावल्या आहेत.

    हॉटेल्स रडारवर

    जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकदेखील प्रशासनाच्या रडारवर आली आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने जिल्ह्यातील ६० हॉटेल्सची अनपेक्षित तपासणी केली. यामध्ये स्वच्छतेचे आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चार हॉटेलमालकांना तातडीने सुधारणा नोटीस दिली आहे. इतर तीन प्रकरणांमध्ये २४ हजार रुपयांचा दंड जागेवरच वसूल करण्यात आला आहे.

    स्वीट मार्ट व बेकरींच्या उत्पादन केंद्रांच्या तपासणीची मागणी

    जिल्ह्यातील स्वीट मार्ट आणि बेकरींमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांची निर्मिती ज्या उत्पादन केंद्रांमध्ये केली जाते, त्या ठिकाणांचीही सखोल तपासणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. मोठ्या प्रमाणावर ग्राहक या आस्थापनांमधून मिठाई, बेकरी पदार्थ व अन्य खाद्यपदार्थांची खरेदी करतात. त्यामुळे हे पदार्थ तयार होणाऱ्या उत्पादन केंद्रांमध्ये अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन होते का, याची खातरजमा करण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

    Maharashtra TimesYuzvendra Chahal: टीम इंडियातून बाहेर, पण बॅटमधून दाखवला दम; चहलची तुफानी खेळी; 29 चेंडूत शतक, 17 सिक्स पाहून चॅलेंज देणारा पीटरसन अवाक

    नियमांचे पालन होते का? तपासावे

    दापोलीसह जिल्ह्यातील विविध भागांतून ही मागणी पुढे येत आहे. काही काळापूर्वी दापोली एसटी स्थानक परिसरातील एका स्वीट मार्टमधून विकत घेतलेला खाद्यपदार्थ निकृष्ट आढळल्याची तक्रार समोर आली होती. मात्र त्यानंतर संबंधित प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाकडून ठोस कारवाई झाल्याचे दिसून आले नाही, असा दावा नागरिकांकडून करण्यात येत आहे. खाद्यपदार्थ तयार करताना कोणत्या प्रकारचे पाणी वापरले जाते, कामगारांच्या आरोग्य तपासण्या नियमितपणे केल्या जातात का, उत्पादन प्रक्रियेदरम्यान स्वच्छता आणि आरोग्यविषयक नियमांचे पालन होते का, तसेच खाद्यपदार्थांची हाताळणी करताना आवश्यक खबरदारी घेतली जाते का, याची तपासणी प्रशासनाने करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा