• Wed. Sep 2nd, 2026

इच्छा तिथे मार्ग! FSSAI प्रमुखांनी सांगितलं तुकाराम मुंढेंच्या धडाकेबाज कामातलं वेगळेपण

एफडीएचं प्रमुखपद हाती येताच तुकाराम मुंढे यांनी कामाचा अक्षरश: धडाका लावला आहे. लोकांच्या ताटात पडणारं अन्न सुरक्षित असावं, यासाठी मुंडे रात्रदिवस झटत आहेत. त्याबद्दल त्यांचं देशभरातून कौतुक होत आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून सुरू असलेल्या धडक कारवायांचं एफएसएसएआय प्रमुखांनी तोंड भरून कौतुक केलं आहे. अन्न सुरक्षा विभागातील ड्युटीकडे शिक्षा असल्याची धारणा त्यांनी खोडून काढली. इच्छा तिथे मार्ग, अशा शब्दांत एफएसएसएआयचे प्रमुख रजीत पुन्हानी यांनी मुंढे यांच्या खात्यामार्फत सुरू असलेल्या कारवायांची स्तुती केली. पुन्हानी एफएसएसएआयचे सीईओ आहेत.

तुकाराम मुंढे यांनी एफडीएचं आयुक्तपद स्वीकारताच राज्यभरात रेस्टॉरंट्स, गोदामं, खाद्यपदार्थ विक्रेत्यांना रडारवर घेतलं आहे. नियम मोडणाऱ्यांवर त्यांच्याकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. राज्यातील एफडीएनं हजारो ठिकाणांची पाहणी करून शेकडो परवाने निलंबित केले आहेत. अवघ्या काही महिन्यांत मुंढे यांनी केलेल्या कारवाईचं जनमानसातून स्वागत होत आहे.

अन्न सुरक्षा विभागांना पूर्वीपासूनच फारसं महत्त्व देण्यात आलेलं नसल्याचं मत एफएसएसएआयच्या प्रमुखांनी नोंदवलं. अनेक अधिकारी या विभागाचा कार्यभार स्वीकारण्यास फारसे उत्सुक नसल्याचंही रजीत पुन्हानी यांनी सांगितलं. ‘अनेकांनी याकडे शिक्षा म्हणून पाहिलं आहे. बऱ्याच अधिकाऱ्यांना अन्न सुरक्षा आयुक्त होण्याची इच्छा नसते,’ असं रजीत पुन्हानी म्हणाले.

‘एफडीएकडे कोणीही लक्ष दिलेलं नाही. एकंदरीत आरोग्याकडे आपण गांभीर्यानं पाहत नाही. आरोग्य विभागात डॉक्टर आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. तुमच्याकडे यंत्रणा आहे. ही व्यवस्था जुनी आहे. कदाचित ती शेकडो वर्षे जुनी आहे,’ असं पुन्हानी यांनी म्हटलं.

‘आरोग्य सुरक्षा हा विषय तसा नवीन आहे. अनेकदा या विभागाचा अतिरिक्त पदभार दिला जात. जर हा विभाग महत्त्वाचा आहे, तर अतिरिक्त पदभार नसायला हवा. तुमच्याकडे स्वतंत्र अन्न सुरक्षा आयुक्त असायला हवा,’ असं पुन्हानी पुढे म्हणाले. प्रत्येक राज्यात स्वतंत्र अन्न सुरक्षा आयुक्त गरजेचा असल्याचं मत त्यांनी मांडलं.

मुंढे यांच्या कामाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. तुकाराम मुंढे यांनी त्यांच्याकडे असलेली टीम न वाढवता केलेली कामगिरी कौतुकास्पद असल्याचं पुन्हानी म्हणाले. ‘मुंढे यांनी मनुष्यबळ न वाढवता सगळं करून दाखवलं. अधिकचे अन्न सुरक्षा अधिकारी नेमले गेले आहेत, असं घडलेलं नाही. याचा अर्थ जिथे इच्छा तिथे मार्ग असतो. एखादी व्यक्ती तितक्याच अधिकाऱ्यांना घेऊन धडाडीनं काम करू शकते,’ अशा शब्दांत पुन्हानी यांनी मुंडे यांच्या कामाचं वेगळेपण सांगितलं.