Monsoon Tracker: जूनच्या पंधरवड्यात राज्यात पावसाने ओढ दिली असल्यामुळे नागरिक, शेतकरी हैराण झाले आहेत. मान्सूनची प्रगती संथ गतीने सुरु झाली असून येत्या काही दिवसांत संपूर्ण राज्यात सक्रिय होण्याची आशा आहे.
भारतीय हवामान विभागाने रविवारी मान्सूनचा अद्ययावत अंदाज जारी केला. यानुसार महाराष्ट्रातील मान्सूनचा प्रवास येत्या चार ते पाच दिवसांमध्ये पुन्हा पुढे सुरू होऊ शकतो. १८ ते २५ जून या कालावधीत पावसाचा जोर कोकण किनारपट्टीवर थोडा वाढू शकेल. २५ जून ते २ जुलै या कालावधीत मध्य महाराष्ट्राच्या काही भागांतही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या दोन आठवड्यांमध्ये मान्सून कोकणासह राज्याच्या बहुतांश ठिकाणी दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे माजी प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी वर्तवला. राज्यात हर्णे आणि सोलापूरपर्यंत मान्सून पोहोचल्यानंतर वायव्येकडील वाऱ्यांनी, तसेच मध्य भारतावर निर्माण झालेल्या प्रत्यावर्ती चक्रीयवात स्थितीमुळे मान्सूनचा प्रवास रखडला आहे.
ठाण्यात १०० टक्के तूट
ठाणे, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांमध्ये पावसाची १०० टक्के तूट आहे. ठाणे जिल्ह्यात १ ते १४ जून या कालावधीत नेहमी सरासरी १०९.२ मिमी. पाऊस पडतो. पण या दोन्ही आठवड्यांत मुंबई १५९.१ आणि उपनगरात १५५.६ मिलीमीटर पाऊस पडतो. मात्र यंदा केवळ एक दिवस पाऊस पडला आहे. राज्यात केवळ सिंधुदुर्गात पावसाने १०० मिमीचा टप्पा ओलांडला असून सिंधुदुर्गमध्ये १०७.५ मिमी., रत्नागिरीत ७७.५ मिमी. पाऊस पडला.
नाशिक जिल्ह्यात यलो अलर्ट
हवामान विभागाने मंगळवारी (दि. १६) जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. उष्ण आणि दमट हवामानामुळे दुपारपासून हलक्या सरींची किंवा ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रविवारी (दि. १४) आणि मंगळवारी दुपारनंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मराठवाड्यात सोमवारी हवामान कसं असेल?
मराठवाड्यातील काही ठिकाणी तुरळक पाऊस होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. दिवसभर ताशी ४०-५० किमी वेगाने वाहणारे वारे असेल आणि याची गती ताशी ६० किमीपर्यंत जाऊ शकते. सध्या मराठवाड्यात उष्णतेची लाट आली असून १६ ते १८ जूनदरम्या विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
विदर्भात मान्सूनआगमन कधी?
मान्सून कोकण किनारपट्टीवर दाखल झाला असला तरी विर्दभापर्यंत मान्सूनचा प्रवास अतिशय संथ गतीने सुरु आहे. त्यामुळे विदर्भात उष्णतेच्या लाटा येत असून सोमवारीही वातावरण दमट राहण्याची शक्यता आहे. मान्सूनसाठी १८ ते २० जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
खानदेशमध्ये हवामान कसं असेल?
खानदेशात सोमवारी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. या भागांत मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी पूर्वमान्सूनच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे.
Mumbai Heat: मुंबईत रात्रीही पारा उतरेना, डोळे लागलेत आभाळाकडे; अचानक उकाडा वाढण्यामागचं कारण काय?
पश्चिम महाराष्ट्रातील हवामान
राज्यात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये सोमवारी मान्सूनपूर्व पाऊस होण्याची शक्यता आहे. पुणे आणा सातऱ्यामधील घाट प्रदेशात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्रात भारतीय हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
