• Mon. Jun 15th, 2026
    प्रणित मोरेच्या शोमुळे झालेल्या वादात KEM मार्डची एन्ट्री; सेजल पवार आणखी गोत्यात

    Pranit More Controversy: स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमधील व्हिडीओमुळे सेजल पवार गोत्यात आली आहे. तिच्यावर चहूबाजूंनी टीका होत आहे. आता केईएम मार्डनंदेखील त्यांची भूमिका जाहीर केली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेच्या क्राऊडवर्कमध्ये वादग्रस्त किस्सा सांगणारी सेजल पवार गोत्यात आली आहे. मुंबईतील केईएम मार्डनं सेजल पवारच्या आक्षेपार्ह विधानांचा निषेध केला आहे. व्यावसायिक आयुष्यात नैतिकता बाळगायला हवी आणि वैद्यकीय क्षेत्राचा आदर राखायला हवा, अशी भूमिका केईम मार्डनं घेतली आहे.

    प्रणित मोरेच्या कार्यक्रमातील सेजल पवारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या कार्यक्रमात सेजलनं वैद्यकीय शिक्षण घेत असतानाचे काही किस्से सांगितले. वैद्यकीय शाखेतील विद्यार्थ्यांना शिकता यावं यासाठी काही जण देहदान करतात. या देहांबद्दल सेजल पवारनं वादग्रस्त टिप्पणी केली. त्यानंतर तिच्यावर टीकेची झोड उठली. सेजल पवार केईमची विद्यार्थिनी आहे. सेजल पवारचा वादग्रस्त व्हिडीओ समोर येताच केईएम मार्डनं एक निवेदन जारी केलं आहे.
    Maharashtra TimesDr Sejal Pawar: अनेकांना फसवलंय! 2 प्रसिद्ध क्रिकेटर्सचा समावेश असल्याचा दावा; प्रणितच्या शोमधील तरुणी नव्या वादात
    ‘वादात सापडलेली एमबीबीएस अंडरग्रॅज्युएट तरुणी आमच्या असोसिएशनची सदस्य नाही. त्या विद्यार्थिनीनं जाहीर माफी मागितलेली आहे. त्या प्रकरणावर जबाबदारी चर्चा व्हावी असं आवाहन त्या तरुणीनं लोकांना केलं आहे. ऑनलाईन त्रास दिला जाऊ नये, टार्गेट करण्यात येऊ नये, असं आवाहनदेखील तिनं केलं आहे,’ असा उल्लेख केईएम मार्डच्या निवेदनात आहे.

    महाराष्ट्र सायबर विभागानं स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरे, हिमांशु जांगडा, सेजल पवार यांच्या विरोधात एफआयआर नोंदवला आहे. अश्लील आणि आक्षेपार्ह कंटेट सोशल मीडियावर शेअर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या तिघांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसोबतच माहिती तंत्रज्ञात कायद्याच्या अंतर्गत गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
    Maharashtra Times‘370 Rs Biryani’ चा वाद आणखी चिघळला, प्रणित मोरे-हिमांशु जांगराला राष्ट्रीय महिला आयोगचा दणका, थेट डीजीपींना निर्देश
    नेमके आरोप काय?
    प्रणित मोरेच्या क्राऊडवर्क कार्यक्रमात सेजल पवारनं वैद्यकीय शिक्षणादरम्याचा किस्सा सांगितला. यावेळी तिनं पुरुषांच्या शवांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं. वैद्यकीय हेतूंसाठी वापरल्या जाणाऱ्या शवांसंदर्भात सेजल पवार बरंच वादग्रस्त बोललं. यामुळे मृत व्यक्तींचा अनादर झाला. सेजल पवारचा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला. सोशल मीडियावर एंगेजमेंट वाढवण्यासाठी आणि अधिकाधिक उत्पन्न मिळवण्यासाठी हा व्हिडीओ प्रमोट करण्यात आल्याचा ठपका महाराष्ट्र सायबर क्राइमनं ठेवला आहे.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.

    मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.

    ‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.

    टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.

    लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.

    लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.

    २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.

    शैक्षणिक पात्रता
    कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा