• Mon. Jun 15th, 2026
    IAS Tukaram Mundhe : गुटखा, तंबाखू विरोधात FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा सर्वात मोठा आदेश, थेट मकोका लागणार

    मुंबई : महाराष्ट्र राज्यात सार्वजनिक आरोग्याच्या संरक्षणासाठी आणि प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या संघटीत्त अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. गुटखा, तंबाखू किंवा निकोटीनयुक्त पानमसाला तसेच तत्सम तंबाखू-मिश्रित प्रतिबंधित अन्नपदार्थाचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण व विक्री करणाऱ्या संघटीत नेटवर्क्सविरुद्ध पात्र प्रकरणांत महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९ म्हणजेच मकोका लागू करण्याबाबत सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज स्पष्ट आदेश दिले आहेत.

    भारताच्या संविधानाच्या कलम ४७ नुसार सार्वजनिक आरोग्य सुधारण्याची आणि आरोग्यास अपायकारक पदार्थांच्या सेवनास प्रतिबंध करण्याची जबाबदारी राज्यावर आहे. गुटखा, तंबाखू किंवा निकोटीनयुक्त पानमसाला आणि अशा प्रकारचे प्रतिबंधित पदार्थ हे सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणारे आहेत. या पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ च्या कलम ३० (२) (अ) अंतर्गत राज्यात अशा पदार्थांच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण व विक्रीवर प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. तथापि, प्रतिबंध असूनही काही ठिकाणी या पदार्थांचा अवैध व्यापार पद्धतशीर, संघटित आणि आर्थिक फायद्यासाठी होत असल्याचे अंमलबजावणी यंत्रणांच्या निदर्शनास आले आहे.

    अन्न व औषध प्रशासन, पोलीस आणि संबंधित यंत्रणांच्या कारवायांमधून असे दिसून आले आहे की, काही प्रकरणांमध्ये केवळ किरकोळ विक्रेतेच नव्हे, तर उत्पादक, पुरवठादार, वित्तपुरवठादार, वाहतूकदार, गोदाम चालक, घाऊक विक्रेते, उप-विक्रेते आणि इतर सहाय्यक घटक यांचा समन्वयित सहभाग असतो. अनेक वेळा बनावट कागदपत्रे, बनावट चलने, डमी कंपन्या, बेनामी व्यवहार, गुप्त गोदामे, आंतरराज्य पुरवठा साखळी, तसेच वाहतूक व वितरणासाठी विविध मार्गाचा वापर केला जातो. त्यामुळे अशा कारवाया केवळ अन्नसुरक्षा उल्लंघनापुरत्या मर्यादित न ठेवता, पात्र प्रकरणांत संघटीत गुन्हेगारीच्या दृष्टीने तपासल्या जाणे अपेक्षित आहे.

    अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत असुरक्षित अन्नाचे उत्पादन, साठवणूक, वितरण किंवा विक्री करणे हा गंभीर गुन्हा आहे. सदर अधिनियमाच्या कलम ५९ अंतर्गत अशा गुन्ह्यांसाठी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत असुरक्षित अन्नाचे उत्पादन, साठवणूक, वितरण कारावासाची तरतूद आहे. कलम ६४ अंतर्गत पुनरावृत्ती झाल्यास वाढीव शिक्षेची तरतूद आहे. तसेच कलमे ३८ व ४१ नुसार अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना तपासणी, शोध व जप्तीचे अधिकार देण्यात आले आहेत. कलम ४२ अंतर्गत अभियोजन सुरू करण्याची प्रक्रिया नमूद आहे.

    तीन वर्ष कारावासाची शिक्षा

    महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९ अंतर्गत “सतत चालणारी बेकायदेशीर कृती”, “संघटित गुन्हा” आणि “संघटित गुन्हेगारी सिंडिकेट” याबाबत स्पष्ट तरतुदी आहेत. एखादा गुन्हा दखलपात्र असून तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षेस पात्र असेल, मागील दहा वर्षांत एकापेक्षा अधिक आरोपपत्रे दाखल झालेली असतील आणि न्यायालयाने त्यांची दखल घेतलेली असेल, तसेच दोन किंवा अधिक व्यक्ती आर्थिक लाभासाठी समन्वयाने कार्यरत असतील, तर अशा प्रकरणात मकोका लागू करण्याची पात्रता तपासून कारवाई करण्याचे तुकाराम मुंढे यांनी निर्देश दिले आहेत.

    तुकाराम मुंढे यांचे अधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश

    या निर्देशांनुसार, प्रतिबंधित अन्नपदार्थांशी संबंधित प्रत्येक अंमलबजावणी कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी आणि नामनिर्देशित अधिकारी यांनी मकोका लागू होण्याची पात्रता तपासणे आवश्यक राहील. पात्रता सिद्ध झाल्यास संबंधित प्रकरणात अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील लागू तरतुदींसह मकोका अंतर्गतही कारवाई करण्यासाठी पोलिसांशी समन्वय साधला जाईल. मात्र, मकोका लागू करण्यासाठी अधिनियमाच्या कलम २३ अंतर्गत आवश्यक असलेली प्रक्रिया काटेकोरपणे पाळली जावी, असे तुकाराम मुंढे यांनी निर्देश दिले आहेत.

    कारवाईचा नेमका उद्देश काय?

    सदर निर्देशांमध्ये केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करण्याऐवजी संपूर्ण नेटवर्कवर कारवाई करण्यावर भर देण्यात आला आहे. उत्पादक, वित्तपुरवठादार, प्रमुख पुरवठादार, वाहतूकदार, गोदाम चालक, घाऊक विक्रेते आणि किरकोळ विक्रेते यांची साखळी पुराव्यांच्या आधारे स्पष्ट करण्यात येणार आहे. संघटित स्वरूपाचे प्रकरण असल्यास उपलब्ध पुराव्यांच्या आधारे नेटवर्कमधील सर्व ओळख पटलेल्या अशा संघटीत कार्यरत सदस्यांविरुद्ध कारवाई करण्याचा दृष्टिकोन स्वीकारण्यात येईल. यामुळे प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या अवैध व्यापारातील मुख्य सूत्रधार व आर्थिक लाभार्थी यांना कायद्याच्या चौकटीत आणणे शक्य होईल.

    नियमित देखरेख कशी ठेवली जाईल?

    प्रत्येक जिल्ह्यात मकोका पात्रता, FIR, आरोपपत्रे, न्यायालयीन आदेश, जप्ती, तपासाची स्थिती आणि अंतिम निकाल यांची नोंद ठेवण्यासाठी स्वतंत्र अभियोजन नोंदवही ठेवण्यात येईल. राज्यस्तरावर मुख्यालयात एकत्रित नोंदवही ठेवण्यात येणार असून त्याद्वारे अशा प्रकरणांवर नियमित देखरेख ठेवली जाईल. सह आयुक्त स्तरावर जिल्हानिहाय अहवालांचा आढावा घेऊन प्रादेशिक अहवाल दरमहा आयुक्तांना सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

    मकोका लागू असलेल्या प्रकरणांत जामीन अर्जावर कायद्याप्रमाणे प्रभावी विरोध करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. मकोका अधिनियमातील कलम २१(७४) अंतर्गत जामिनासाठी कठोर दुहेरी अटी लागू होतात. त्यामुळे अशा प्रकरणांत शासकीय अभियोक्ता, पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन यांच्यात समन्वय ठेवून न्यायालयासमोर आवश्यक पुरावे व तथ्ये मांडली जातील याची खात्री अन्न व औषध प्रशासनाच्या क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी घ्यावयाचे निर्देश दिले आहेत.

    या संपूर्ण कारवाईचा उद्देश नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे, प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या अवैध व्यापारामागील संघटित साखळी मोडीत काढणे, आर्थिक लाभासाठी सार्वजनिक आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना कठोर कायदेशीर परिणामांना सामोरे जाण्यास भाग पाडणे आणि राज्यात प्रतिबंध आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करणे हा आहे. अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, गुटखा, तंबाखू किंवा निकोटीनयुक्त पानमसाला किंवा इतर प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण किंवा विक्री होत असल्यास तत्काळ स्थानिक अन्न व औषध प्रशासन कार्यालय किंवा स्थानिक पोलीस यांना माहिती द्यावी.

    ‘कायद्याचे पालन करणाऱ्या व्यापाऱ्यांना त्रास देण्यासाठी कारवाई नाही’

    तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे की, कायद्याचे पालन करणाऱ्या व्यापाऱ्यांना कोणताही त्रास देणे हा उद्देश नाही. मात्र, सार्वजनिक आरोग्यास हानी पोहोचवून संघटीत पद्धतीने प्रतिबंधित अन्नपदार्थांचा व्यापार करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि नेटवर्क्सविरुद्ध कठोर, पुराव्यांवर आधारित आणि कायदेशीरदृष्ट्या कठोर कारवाई केली जाईल. प्रतिबंधित अन्नपदार्थांचा अवैध व्यापार हा केवळ अन्नसुरक्षा उल्लंघन नसून, यापुढे तो सार्वजनिक आरोग्याविरुद्धचा गंभीर संघटित गुन्हा म्हणून हाताळला जाईल.

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed