Nashik MLC Election: बहुमत असले तरी दराडेंना दगाफटका होण्याची भीती महायुतीच्या नेत्यांना आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी माघारीसाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत.
नाशिक-जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत झालेली बंडखोरी शमविताना मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत आणि दादा भुसे यांची चांगलीच दमछाक होत आहे. नाशिकमध्ये शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांच्याविरोधात उभे ठाकलेल्या प्रसाद हिरे यांनी माघारीची घोषणा केली असली तरी अपक्ष गोकुळ गिते यांनी नाकात दम आणला आहे. सरकारमधील तिन्ही मंत्री पाच दिवसांपासून गितेंची मनधरणी करीत आहेत. त्यानंतरही ते लढण्यावर ठाम आहेत.
विधान परिषद निवडणुकीत ‘मॅचफिक्सिंग’? पुणे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अरविंद शिंदेंचा आरोप
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (दि.९) गितेंना पाचारण केले होते. परंतु, ते न पोहोचल्याने ही भेट होऊ शकली नाही. अखेर बुधवारी गणेश गिते आणि नीलेश बोरा यांनी मध्यस्ती करीत गोकुळ गिते यांची महाजन आणि सामंत यांच्याशी भेट घडवून आणली. या बैठकीत तिघांमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून, गिते हे दराडेंना पाठिंबा देणार असून, यासंदर्भात आज मंत्र्यांच्या उपस्थितीत गोकुळ गिते पत्रकार परिषद घेणार असल्याचा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे. परंतु, गोकुळ गितेंकडून याबाबत दुजोरा मिळाला नाही.
बहुमत असूनही पराभवाची भीती
विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी महायुतीतील भाजपकडे १९० , शिवसेनेकडे १७१ आणि राष्ट्रवादीकडे १०७ असे तीन पक्ष मिळून ४६८ एवढे बहुमत आहे. तरीही महायुतीकडून नाशिकची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न झाले. त्यात अपयश आल्यानंतरही प्रसाद हिरेंपाठोपाठ गोकुळ गितेंच्या माघारीसाठी महाजन, सामंत यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
‘राजकारणात काहीही होऊ शकतं, मिशन टायगर हे एकनाथ शिंदेंनीच करावं’, Sanjay Gaikwad यांचं वक्तव्य
नगरसेवकांच्या इच्छेवर पाणी
शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंसमोर भाजप बंडखोर प्रसाद हिरे आणि अपक्ष गोकुळ गितेंनी आव्हान उभे केले होते. दुसरीकडे निवडणूक होऊ नये यासाठी महायुतीच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू होते. पण, ही निवडणूक व्हावी अशी ६१९ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारांची इच्छा होती. निवडणूक झाल्यास मोठ्या प्रमाणावर ‘लक्ष्मी’दर्शनाचे योग येणार होते. त्यामुळे नगरसेवकांनी निवडणुकीसाठी देव पाण्यात ठेवले होते. गितेंनी रिंगणातून माघार घेतल्यास नगरसेवकांच्या इच्छेवर पाणी फिरणार आहे.
