राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर या सध्या त्यांच्या एका पोस्टमुळे पुन्हा आता चर्चेत आल्या आहेत. त्यांनी आता अशोक खरात प्रकरणात माझी बदनामी करणाऱ्यांना कोर्टात खेचलं असल्याचं सांगितलं आहे, त्यांनी व्हिडिओमधून सविस्तर भूमिका मांडली आहे.
रूपाली चाकणकर यांनी म्हटले आहे की, खरात प्रकरणाच्या सुरुवातीपासूनच आपली भूमिका स्पष्ट होती. खरात यांच्या कोणत्याही आर्थिक व्यवहाराशी, जमीन व्यवहारातील भागीदारीशी किंवा इतर कोणत्याही वादग्रस्त बाबींशी आपला संबंध नव्हता. तसेच आपण कोणत्याही महिलेला खरात यांच्याकडे नेले नसल्याचा दावाही त्यांनी केला.
‘बदनामीचे आरोप सहन केले’
गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून अत्यंत अश्लाघ्य भाषेत आपल्यावर आणि कुटुंबीयांवर आरोप करण्यात आले. कोणताही पुरावा नसताना सातत्याने बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे आता हा लढा न्यायालयात लढण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. खरात यांना कुटुंबीय आध्यात्मिक गुरु मानत होते. पाद्यपूजेचा जो व्हिडिओ समोर आला, तो अनेक वर्षांपूर्वीचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्या काळात आपण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षही नव्हतो, असेही त्यांनी नमूद केले.
Jalgaon News: बिबट्याशी थेट दोन हात! जळगावच्या तरुणाने जिवाची पर्वा न करता जिवंत बिबट्या पकडला; पंचक्रोशीत धाडसाची चर्चा
‘पदांचा राजीनामा तपासासाठी दिला’
खरात प्रकरणाचा तपास निष्पक्ष आणि पारदर्शक व्हावा, यासाठी आपण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासह पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला होता, असे चाकणकर यांनी म्हटले. मात्र त्यानंतरही आपल्याविरोधात चिखलफेक सुरूच राहिल्याचा आरोप त्यांनी केला. काही लोकांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून व्हिडिओ तयार केले आणि बदनामीचे षडयंत्र रचल्याचा आरोपही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे.
आशा मिरगेंविरोधात न्यायालयीन कारवाई
चाकणकर यांनी सांगितले की, एका चर्चासत्रात आशा मिरगे यांनी केलेल्या कथित वक्तव्यांनंतर त्यांनी ४ एप्रिल रोजी कायदेशीर नोटीस पाठवली होती. मात्र नोटीस स्वीकारण्यात आली नसल्याने ती अनेकदा परत आली. अखेर माझगाव न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीची दखल घेत न्यायालयाने आशा मिरगे यांना २ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिल्याचे चाकणकर यांनी सांगितले. त्या दिवशी आपण स्वतःही न्यायालयात उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘स्त्रीत्वाच्या सन्मानासाठी लढा’
पुरावा नसताना चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात ही लढाई असल्याचे चाकणकर यांनी म्हटले आहे. आशा मिरगे यांच्याव्यतिरिक्त इतर काही महिलांनी केलेल्या आरोपांबाबतही दिल्ली उच्च न्यायालयातून नोटिसा पाठविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
“हा लढा केवळ माझ्यासाठी नाही, तर कोणत्याही महिलेच्या सन्मानावर विनाकारण प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या प्रवृत्तीविरोधातील आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
