मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ईमेल आला आहे. मात्र धमक्यांना न घाबरता जनतेची सेवा सुरूच ठेवणार असल्याची ठाम भूमिका त्यांनी घेतली, या प्रकरणाचा तपास सुरू असून दोषींवर कारवाई होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्यातील इतर महापौरांनाही अशाच धमक्या आल्याचा दावा
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना मंगळवारी सकाळी बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ईमेल प्राप्त झाला. या घटनेनंतर प्रशासनाने तातडीने सुरक्षा यंत्रणा सक्रिय केली असली तरी महापौरांनी आपले नियोजित कामकाज सुरूच ठेवले. रितू तावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे ९.२० वाजता त्यांना धमकीचा ईमेल आला. याबाबत महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाने आणि त्यानंतर पोलिसांनी तात्काळ माहिती दिली. मात्र जनतेची कामे आणि आधीच ठरलेल्या महत्त्वाच्या बैठका रद्द न करता त्या नियोजित कार्यक्रमानुसार महानगरपालिका मुख्यालयात दाखल झाल्या.
‘कर्तव्याला नेहमीच पहिले प्राधान्य आहे आणि राहील,’
या प्रकरणात पोलीस आणि महानगरपालिका प्रशासन आवश्यक ती कायदेशीर आणि तांत्रिक कारवाई करत असल्याचे सांगत त्यांनी आपल्या सुरक्षेबाबत प्रशासनावर पूर्ण विश्वास व्यक्त केला. वाहन, कार्यालय आणि वैयक्तिक सुरक्षेसंदर्भातील सर्व बाबींची तपासणी आणि आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असेही त्यांनी नमूद केले.
धमक्यांमुळे आपण घाबरणार नसल्याचे सांगताना रितू तावडे म्हणाल्या की, यापूर्वीही काही संवेदनशील विषयांवर कारवाई करताना त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र त्यावेळीही त्या झुकल्या नाहीत आणि पुढेही झुकणार नाहीत. तसेच केवळ मुंबईतच नव्हे, तर राज्यातील इतर काही शहरांच्या महापौरांनाही अशाच प्रकारच्या धमक्या आल्याची माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामागे काही मोठे कटकारस्थान असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही त्यांनी म्हटले.
‘दोषींवर कठोर कारवाई होईल’
राज्याच्या गृह खात्यावर पूर्ण विश्वास असल्याचे सांगत या प्रकरणाचा छडा लावून दोषींवर कठोर कारवाई होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “मुंबईकरांच्या हितासाठी माझे काम सुरूच राहील. अशा धमक्यांमुळे मुंबईच्या विकासाचा आणि सुरक्षेचा वेग कमी होणार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
