• Wed. Jun 10th, 2026
    Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंचा झंझावात आता शिर्डीत! साईभक्तांच्या आरोग्याशी खेळ, FDA पथक कारवाईसाठी धडकताच धाबे दणाणले!

    Shirdi Sai Baba News: या कारवाईसाठी गेल्या काही तासांपासून अन्न आणि औषध प्रशासनाचे पथक शिर्डीत ठाण मांडून बसले आहे.

    तुकाराम मुंढेंचा झंझावात आता शिर्डीत! साईभक्तांच्या आरोग्याशी खेळ(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मोबीन खान, शिर्डी: साईबाबांच्या शिर्डीत भाविकांच्या आरोग्याशी अक्षरशः खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंदिर परिसरात असणाऱ्या शेकडो प्रसादाच्या दुकानांवर भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांची विक्री सुरू असल्याचं उघड झालं. बुरशीयुक्त पेढ्यांबाबत भाविकांकडून तक्रारी आल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासन खडबडून जागे झाले असून प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे. प्रसादाबाबतचे वृत्त प्रसारित होताच शिर्डीत धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे.

    दररोज हजारो तर वर्षाकाठी लाखो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येतात. अनेक भाविक साई मंदिर परिसरात असणाऱ्या खाजगी दुकानदारांकडून प्रसाद विकत घेतात. मात्र या दुकानांमध्ये विकल्या जाणाऱ्या पेढा प्रसादावर पॅकेजिंग आणि एक्सपायरी डेट, तसेच हा पेढा नेमका कुठे आणि कोण बनवतो याबाबत उल्लेख नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनेक वर्षांपासून अक्षरशः दगडासारख्या पेढा प्रसादाची साईभक्तांना विक्री केली जात आहे. पॅकिंग केलेल्या पेढ्यांना बुरशी लागल्याचं देखील आढळून आलं आहे. प्रसादाच्या नावाखाली साईभक्तांच्या आरोग्याशी खेळ सुरू असून, शिर्डी नगरपालिकेसह अन्न व औषध प्रशासनाचे याकडे साफ दुर्लक्ष झालं होतं. निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांमुळे साईभक्तांमध्ये तीव्र नाराजी असून, श्रद्धेच्या नावाखाली भाविकांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ थांबणार तरी कधी? असा प्रश्न उपस्थित होत होता.

    दरम्यान, राज्यात अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळखोरांविरोधात धडक कारवाया सुरू केली असून शिर्डीत साईभक्तांकडून बुरशी लागलेले पेढे विक्री होत असल्याची तक्रार समोर आल्यानंतर लगेच अन्न औषध प्रशासनाचे पथक शिर्डीत दाखल झाले आहे. पथकाकडून सध्या याबाबतची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

    साई मंदिर परिसरातील पेढा प्रसाद दुकानांवर छापेमारी करण्यात आली असून पेढा प्रसादाचे नमुने गोळा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. हे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जातील आणि त्यानंतर दोषी आढळल्यास पेढा उत्पादकांवर कठोर कारवाई होणार आहे. प्रसाद विक्रेत्यांकडून उत्पादकांची माहिती घेण्यास सुरूवात करण्यात आली आहे. या कारवाईमुळे भेसळखोरांचे धाबे दणाणल्याचे चित्र आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा